रामभाऊ नाठे : इगतपुरीनामा न्यूज, दि. २३
मुंबई आग्रा महामार्गावरील गोंदे दुमाला औद्योगिक वसाहतीत राष्ट्रीय महामार्गावरील गतिरोधक आणू झेब्रा क्रॉसिंग नष्ट झाले आहेत. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या अपघातांना आमंत्रण मिळत आहे. या भागात गतिरोधक व झेब्रा क्रॉसिंग तातडीने टाकण्यात यावे अशी मागणी गोंदे दुमाला परिसरातील नागरिकांकडून होत आहे. इगतपुरी तालुक्यात सर्वात मोठी समजली जाणारी गोंदे दुमाला औद्योगिक वसाहत उदयाला आली आहे. या ठिकाणावरून नेहमीच कामगार, शेतकरी, शालेय विद्यार्थी, रेल्वे कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात ये जा करत असतो. त्यामुळे महामार्गावरील रस्ता ओलांडतांना गाड्यांचा भरधाव वेग लक्षात न आल्याने अनेकदा छोटे मोठे अपघात होतात. अनेकदा पायी चालणाऱ्या नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यातील काहींना कायमचे अपंगत्व आले आहे. अपघाताची मालिका रोखण्यासाठी याठिकाणी पूर्वीप्रमाणेच गतिरोधक बसविण्यात यावे अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. मागणी पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
यापूर्वी गोंदे दुमाला फाटा येथे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दोन्ही बाजूने गतिरोधक टाकून त्यावर झेब्रा क्रॉसिंग करण्यात आले होते. परंतु गेल्या पावसाळ्यामध्ये पावसाच्या पाण्याने महामार्गाला मोठमोठे खड्डे पडल्याने त्या खड्ड्यांच्या दुरुस्तीसाठी महामार्ग प्राधिकरणाने त्यावर डांबर व कच टाकून रस्ता दुरुस्त करण्याचे काम केले. परंतु या ठिकाणी दोन्ही बाजूंची गतिरोधक काढून टाकण्यात आले. त्यामुळे नाशिककडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या गाड्यांचा वेग वाढल्याने गाड्या भरधाव वेगात येतात. या ठिकाणी पायी चालणारे व कंपन्यांमधून कामगारांना ने आण करण्यासाठी बसेस व गाड्यांना रस्ता ओलांडावा लागत असतो. तो ओलांडत असताना वाहनचालकांसह शेतकरी कामगार वर्गाला ही मोठी तारेवरची कसरत करून रस्ता ओलांडावा लागत आहे. या ठिकाणी रस्ता ओलांडतांना अपघात घडत असल्याने या ठिकाणी त्वरित गतिरोधक टाकून झेब्रा क्रॉसिंग करण्यात यावे अशी मागणी नागरिकांसह परिसरातील शेतकरी व कामगार वाहनचालक यांनी केली आहे. मागणीची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला औद्योगिक वसाहतीमध्ये छोटे मोठे साठ ते सत्तर कारखाने आहेत. या ठिकाणी हजारो कामगार दररोज ये-जा करत असतात. महामार्गाच्या दोन्ही बाजूने कारखाने असल्याने महामार्ग ओलांडूनच कामगारांसह शेतकरी व नागरिकांना ये जा करावी लागत असते. त्यामुळे महामार्गावर यापूर्वी झालेल्या अपघातामुळे नागरिकांच्या मागणीनंतर गतिरोधक टाकण्यात आले होते. रस्त्याचे काम चालू असताना गोंदे दुमाला ग्रामपंचायतीच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला गतिरोधक पुन्हा टाकण्यासाठी पत्रव्यवहारही करण्यात आला होता. परंतु याकडे दुर्लक्ष करत गतिरोधक काढून टाकण्यात आल्याने वाहनांचा वेग वाढला आहे. येथे अपघातांची मालिका सुरू झाली आहे त्यामुळे या ठिकाणी गतिरोधक टाकण्यात यावे अन्यथा मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे अशी माहिती
गोंदे दुमालाचे लोकनियुक्त सरपंच शरद सोनवणे यांनी दिला आहे.