खैरगाव शिदवाडी येथील वृद्ध महिला बिबट्याच्या हल्ल्यात ठार ; हिंस्त्र बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करा : ऍड. मारुती आघाण

इगतपुरीनामा न्यूज, दि. १
इगतपुरी तालुक्यातील खैरगाव शिदवाडी येथील 68 वर्षीय वृद्ध महिलेवर दबा धरून बसलेल्या बिबट्याने हल्ला चढवला. ह्यामध्ये महिला ठार झाल्याची घटना आज रात्री पावणे दहाच्या सुमारास घडली आहे. बुधाबाई चंदर आघाण मृत वृद्ध महिलेचे नाव आहे. गावाजवळ शेतात घराजवळ ही घटना घडल्याने नागरिकांत घबराट पसरली आहे. इगतपुरीच्या वन विभागाला याबाबतची माहिती लोकनियुक्त सरपंच ऍड. मारुती आघाण यांनी दिली. बिबट्याच्या हल्ल्याच्या घटनांमुळे आदिवासी ग्रामस्थांना मोठ्या संकटांचा सामना करावा लागतो. मयत महिलेच्या वारसांना तातडीने मदत द्यावी. बिबट्यांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी सरपंच ऍड. मारुती आघाण यांनी केली आहे.
प्राप्त माहितीनुसार, इगतपुरी तालुक्यातील खैरगाव येथील शिदवाडी ह्या गावात आपल्या गावाजवळील शेतात बुधाबाई आघाण यांचे कुटुंब राहते. आज रात्री पावणे दहा वाजेच्या सुमारास बुधाबाई लघुशंकेसाठी घराबाहेर गेली. काही सेकंदातच दबा धरून बसलेल्या बिबट्याने तिच्यावर हल्ला चढवला. आवाजामुळे बुधाबाई हिच्या मुलीने बाहेर येऊन पाहिल्याने आरडाओरडा केला. यामुळे बिबट्या पळून गेला मात्र हल्ला झालेली बुधाबाई चंदर आघाण ही महिला तोपर्यंत ठार झाली होती. याबाबत खैरगावचे सरपंच ऍड. मारुती आघाण यांनी घोटी पोलीस ठाणे आणि इगतपुरीच्या वन अधिकाऱ्यांना माहिती दिली. ठार झालेल्या महिलेच्या कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत करावी, बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी ऍड. आघाण यांनी केली आहे. दरम्यान बिबट्याकडून नागरिकांवर हल्ला करण्याचे प्रकार वाढत असताना वन विभाग नेमके काय करीत आहे असा संतप्त सवाल उपस्थित झाला आहे.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!