इगतपुरीनामा न्यूज, दि. ९
महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी एकात्मिक बालविकास प्रकल्पाची भूमिका महत्वपूर्ण आहे. महिलांना स्वयंपूर्ण केल्यास त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला दूरगामी फायदा होतो. यामुळे सामाजिक स्तरावर महिलांचे जीवनमान उंचावण्यास मदत होते. महिला सक्षमीकरण करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या सेस निधीतून सुरू असलेली विविध प्रशिक्षणे ग्रामीण महिलांना आधार देणारी आहेत असे प्रतिपादन इगतपुरीचे सभापती सोमनाथ जोशी यांनी केले. साकुर येथे पंचायत समिती सेस अंतर्गत शिवण कर्तन प्रशिक्षण वर्गाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी बोलतांना त्यांनी पुढे सांगितले की, जिल्हा परिषद सेस निधीतून दुग्धजन्य पदार्थ, घनकचरा व बायोगॅस, इमिटेशन ज्वेलरी, ज्यूडो कराटे, शिवण कर्तन अशी अनेक प्रशिक्षणे घेतली जातात. आतापर्यंत ह्या योजनेअंतर्गत ८३० लाभार्थी महिलांनी ह्याचा लाभ घेतला आहे.
इगतपुरीचे बालविकास प्रकल्पाधिकारी पंडित वाकडे म्हणाले की, आपल्याला महिलांच्या उन्नतीसाठी पुढाकार घेऊन त्यांच्यातील विविध कौशल्ये विकसित करावी लागतील. यासाठी कुटुंबातील जबाबदार घटकांनी महिलांच्या पंखात बळ भरावे. इगतपुरी प्रकल्पामध्ये विविध प्रशिक्षणाचा फायदा महिलांना होत आहे. सरपंच विनोद आवारी यांनी एकात्मिक बालविकास प्रकल्प इगतपुरीचे काम वाखाणण्याजोगे असल्याचे सांगत महिलांना समृद्ध करण्यासाठी प्रशिक्षणे नेहमीच सुरू ठेवावीत अशी सूचना केली. साकुर येथील प्रशिक्षणावेळी २४ लाभार्थी महिलांना तज्ञ मार्गदर्शकांनी प्रशिक्षण दिले. ह्या प्रशिक्षणाबाबत महिलांनी समाधान व्यक्त केले. प्रशिक्षणावेळी उपसभापती विठ्ठल लंगडे, शिवसेना तालुकाप्रमुख भगवान आडॊळे, पंचायत समिती सदस्य अण्णा पवार, जेष्ठ नेते रघुनाथ तोकडे, सहाय्यक बालविकास प्रकल्पधिकारी वंदना सोनवणे, साकुरचे सरपंच विनोद आवारी, उपसरपंच दिनकर सहाणे, ग्रामपंचायत सदस्य तुकाराम सहाणे, संजय सहाणे, भारत सहाणे, विष्णु सहाणे, ग्रामसेवक जितेंद्र चाचरे, पर्यवेक्षिका सुखदा पाराशरे, अंगणवाडी सेविका सुमन सहाणे, आशा सहाणे, मंगल सहाणे, रेखा सहाणे, लाभार्थी महिला, युवती आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.