इगतपुरी तालुक्यातील ओबीसी आणि भटक्या विमुक्त जातीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती ३ वर्षांपासून प्रलंबित : दरवर्षीच्या खर्चामुळे संतापलेल्या पालकांचे शिक्षकांशी होताहेत वाद

इगतपुरीनामा न्यूज, दि. १७

इगतपुरी तालुक्यातील इयत्ता १ ली ते १० वी मध्ये शिकणाऱ्या ओबीसी आणि भटक्या विमुक्त जातीच्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीची रक्कम गेल्या ३ वर्षांपासून देण्यात आलेली नाही. प्राथमिक शाळांतील शिक्षकांना दरवर्षी कामाला जुंपून पात्र विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पूर्तता करण्यात येते. मात्र नियोजनशून्य कारभारामुळे एकही विद्यार्थ्यांला शिष्यवृत्तीची रक्कम मिळालेली नाही. ३ वर्षात अनेकदा बँकेचे पासबुक, आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला वगैरे पूर्तता करून पालक वैतागले आहेत. सध्या शासनाच्या निर्देशानुसार पुन्हा एकदा यावर्षी साठी शिक्षकांना सूचना करण्यात आल्या आहेत. तथापि वेळेत पूर्तता करूनही पालकांना कागदपत्रांसाठी हकनाक खर्च करावा लागतो. शिष्यवृत्तीची रक्कम मात्र मिळत नाही. यामुळे पालक आणि शिक्षकांचे भांडण जुंपत असल्याचे दिसते आहे. ग्रामीण भागातील मजुरी करणारे पालक व्यर्थ खर्चाला आणि वारंवार मागण्यात येणाऱ्या कागदपत्रांना कंटाळले आहेत. ह्या प्रकरणी शासनाने खुलासा करून पालकांचे समाधान करावे अशी मागणी जोर धरत आहे.

इगतपुरी तालुक्यातील शाळांमध्ये शिकणाऱ्या OBC / VJNT विद्यार्थ्यांना त्यांची शिष्यवृत्ती गेल्या २ -३ वर्षापासुन प्रस्ताव देऊनही अद्याप मिळालेली नाही. पुन्हा यावर्षीही शाळांना प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना वरिष्ठांनी पाठवल्या आहेत. त्यासाठी पालकांना चालू वर्षाचा उत्पन्नाचा दाखला काढावा लागतो. त्यासाठी पालकांचा होणारा खर्च, कामकाज बुडवुन केलेला खटाटोप आणि मनस्ताप मात्र वेगळाच होत आहे. शाळा सुरू होऊन आठवडा उलटला न उलटला तोच पून्हा शिक्षकांना प्रस्ताव जमा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यासाठीची बिले सुद्धा तयार करण्यासाठी कामाला शिक्षकांना कामाला जुंपले गेले आहे. मात्र तीन वर्षापासून प्रलंबित असणाऱ्या शिष्यवृत्तीमुळे पालकांचा मात्र शिक्षकांवर रोष वाढला आहे. शासनाने ह्याबाबत पालकांसाठी तातडीने खुलासा करावा अशी मागणी होत आहे.

तीन वर्षांपासून गरीब पालक पदरमोड करून शिष्यवृत्ती मिळेल ह्या आशेने आवश्यक ती पूर्तता करतात. हे करूनही शिष्यवृत्ती मात्र मिळत नाही. त्यामुळे पालक ह्यावर्षी संतप्त झाले आहेत. शिष्यवृत्ती न मिळाल्याचा ठपका शिक्षकांवर येऊन भांडणे होत आहेत. २ वर्षात आधीच विद्यार्थी अभ्यास विसरले असल्याने शिक्षकांना यासाठी प्राधान्य द्यायला सांगावे. व्यर्थ आणि वाद घडवणाऱ्या शिष्यवृत्तीचे काम तात्काळ थांबवा.

- अनिल भोपे, सरपंच टिटोली

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!