इगतपुरीनामा न्यूज, दि. १७
नरदेह दुर्लभ असून नाशिवंत आणि क्षणभंगुर असणाऱ्या ह्या देहाद्वारे ईश्वराच्या परमकृपेसाठी ते एकमेव साधन आहे. इहलोकीच्या प्रलोभनाला बळी न पडता ईश्वरप्राप्तीचे अंतिम ध्येय साध्य करण्यात नरदेहाची इतिकर्तव्यता आहे. ह्या ध्येयाने झपाटलेल्या कृषिभूषण स्व. कारभारी दादा गीते यांच्या सर्वांगीण कार्याचा दरवळ हिमालयाच्या उंचीचा आहे. स्व. दादांचे प्रेरणास्थळ सर्वांसाठी दीपस्तंभ ठरेल असे प्रतिपादन आचार्य महामंडलेश्वर रामकृष्णदास महाराज लहवितकर यांनी केले. सोनोशी ता. संगमनेर येथील कृषी पंढरीचे वारकरी कृषिभूषण प्रयोगशील शेतकरी स्व. कारभारी ( दादा ) चिमाजी गिते यांच्या दशक्रिया विधी निमित्ताने प्रवचनप्रसंगी हभप लहवितकर महाराज बोलत होते. ते पुढे म्हणाले की, या जन्माचे सार्थक करुन घेण्याचा विचार क्षणोक्षणी करून ज्यांनी आयुष्यभर समाजासाठी काम उभे केले असे स्व. दादा हे संतस्वरूप असल्याने आदरणीय ठरतात. प्रत्येक माणसात असणाऱ्या परमेश्वरावर निस्सीम प्रेम करणारे स्व. दादा यांच्या जाण्याने आपण सगळे पोरके झालो असल्याचे सांगत भाऊसाहेब, लहानू आणि हरीभाऊ ही तिन्ही मुले त्यांच्या कार्याचा वारसा पुढे चालवतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी कीर्तनकार राधाताई सानप, मुक्ताताई सांगळे, जेष्ठ नेते लक्ष्मणराव कुटे, नगर जिल्हा परिषद सदस्य भाऊसाहेब कुटे, गणपतराव सांगळे, ठाणे जिल्हा परिषद सदस्य श्री. घरत, साहेबराव नवले, सुदामराव सानप, सरपंच राजेंद्र सानप, सुहास मोरे आदी हजर होते. अहमदनगर नाशिक जिल्ह्यासह महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील मान्यवर, ग्रामस्थ आणि स्व. दादांवर प्रेम करणारा मोठा जनसमुदाय उपस्थित होता. मान्यवरांनी त्यांच्या जीवन प्रसंगावरील पैलूंची माहिती देऊन आदरांजली अर्पण केली. स्व. दादांचे प्रेरणास्थळ त्यांच्या शेतात निर्मित करण्यात आले असून प्रवेशद्वारावर पंढरीचा विठुराया व दादांच्या प्रतिमेच्या सुबक रांगोळीने जनसमुदायाचे लक्ष वेधले गेले. यावेळी गिते परिवारासह नातेवाईक आणि नागरिक मोठ्या संख्येने कोविडचे नियम पाळून उपस्थित होते.