
भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज, दि. १७
हिरवा निसर्ग हा भोवतीने …जीवन सफर करा मस्तीने… मन सरगम छेडा रे..जीवनाचे गीत गा रे….धुंद व्हा रे….अशी काही गीते, निर्मळ निसर्ग सौंदर्य आणि महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध सेलिब्रिटी म्हटल्यावर आनंदाला काय तोटा ? ? अभिनेत्री असल्याचा बुरखा बाजूला ठेवून दीपाली सय्यद यांनी चिमुकल्या विद्यार्थ्यांसोबत मनमुराद आनंद लुटला. पुढे जाण्यासाठी शिक्षण आवश्यक असून त्यासाठी कोणतीही तडजोड करू नका असे त्यांनी लाडिकपणाने चिमुकल्यांना बजावले. एवढ्या मोठ्या अभिनेत्रीने आपल्या बालकांसोबत गमतीजमती केल्याने पालकांच्या डोळ्यांतून यावेळी अश्रुधारा वाहत होत्या. इगतपुरी तालुक्यातील अतिदुर्गम असणाऱ्या मोडाळे गावात सामाजिक दातृत्वाचा महत्वाचा पैलू असणारी अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी येथील विद्यार्थी आणि गावकऱ्यांना आनंदाचा धक्का दिला ग्रामपंचायत कार्यालय, विकासकामे, शाळांना भेटी, ग्रामस्थांशी सुसंवाद साधून त्यांनी मनमुराद आनंद लुटला. माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके यांच्या संकल्पनेतल्या विकासाला आकार देण्यासाठी आवश्यक ते सर्व साहाय्य करून गावाचे रुपडे बदलून टाकण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

भरभरून निसर्गसौंदर्य आणि ग्रामीण लोकजीवन असणारे इगतपुरी तालुक्यातील मोडाळे गाव आहे. ह्या गावात अभिनेत्री दीपाली सय्यद ह्या विकासाचे मॉडेल साकारण्यासाठी भेट देणार असल्याचे समजताच गावातील आबालवृद्धांनी त्यांच्या स्वागताची जोरदार तयारी केली. त्यांचे आगमन होताच चिमुकल्या विद्यार्थ्यांसह गावकऱ्यांनी जल्लोष केला. ग्रामपंचायत कार्यालय भागातील विकासकामे, गावातील मूलभूत सुविधा आणि दूरदृष्टीने शाश्वत कामे करण्यासाठी त्यांनी सूक्ष्मपणे पाहणी केली. अनेकांशी संवाद साधून ग्रामविकास साधण्यासाठी मनमोकळेपणाने सर्वांना बोलके केले. यावेळी ग्रामस्थ, ग्रामपंचायत आणि शाळांच्या वतीने दीपाली सय्यद यांचे स्वागत आणि सत्कार करण्यात आला.
बालिका आणि विद्यार्थी हे देशाचे भविष्य असून सदृढ पिढी निर्मित करण्यासाठी ह्या बालकांना सुयोग्य मार्ग आणि मार्गदर्शन आवश्यक असल्याचे दीपाली सय्यद म्हणाल्या.

कोणीतरी येईल आणि आपलं गाव बदलून टाकील याची वाट न पाहता आपणच आपल्या गावाला सुंदर करूया. ग्रामविकास साधण्यासाठी गोरख बोडके यांच्यासारख्या दुर्मिळ व्यक्तिमत्वाने सुरू केलेले काम मौलिक असून सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. ग्रामस्थांचा सहभाग असलेले कोणतेही काम यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही. त्यानुसार चांगल्या कामांमध्ये सर्वांनी आपले योगदान देणे गरजेचे आहे असे त्या चर्चेवेळी म्हणाल्या. माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके म्हणाले की, मोठी कीर्ती असणाऱ्या अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी मोडाळे गावाला दिलेली भेट अविस्मरणीय आहे. अनेक गावांना बदलून टाकण्याचे कसब त्यांच्यामध्ये असून त्यांनी गावासाठी काय करता येईल याबाबत आमच्याशी संवाद साधला आहे. आगामी काळात त्यांच्या माध्यमातून मोडाळे नव्या उंचीवर नेण्याचा त्यांचा प्रयत्न नक्कीच यशस्वी होईल.
यावेळी ग्रामपंचायत पदाधिकारी, सोसायटी पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी, ग्रामसेवक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते.

