
इगतपुरीनामा न्यूज, दि. ३१
केंद्रीय जनजातीय कार्य राज्यमंत्री रेणुका सिंह यांनी भारतीय जनजाति सहकारी विपणन विकास परिसंघ महाराष्ट्र (ट्रायफेड ) यांचे मुंबई फोर्ट येथील ट्रायब्ज इंडिया शोरूममध्ये जाऊन दुकानातील खरेदी विक्री, आदिवासींनी बनवलेल्या वस्तू यांची माहिती घेतली. “आदिवासींच्या आर्थिक उन्नतीसाठी पर्याय म्हणून ट्रायफेडचे प्रयत्न यशस्वी आणि कौतुकास्पद आहे” असे यावेळी केंद्रीय मंत्री रेणुका सिंह यांनी सांगितले.
यानंतर रेणुका सिंह यांनी महाराष्ट्रातील वन धन योजनेबद्दल माहिती घेऊन सद्यस्थितीत असलेल्या 264 केंद्राहून अधिक नवीन केंद्रे सुरू करण्यासंदर्भात सूचना दिल्या. एकलव्य रेसिडेन्सी स्कूल संदर्भात प्रकल्प अधिकारी इतर अधिकारी यांच्याशी चर्चा केली. भविष्यात आदिवासी समाजाने चांगल्या दर्जाचे शिक्षण घ्यावे यासाठी शाळा वाढवण्याबद्दल सूचना केल्या. रायगड जिल्ह्यातील तळोदा मध्ये सुरू असलेल्या ट्रायफूड प्रकल्प ची पाहणी केली. केंद्रीय जनजातीय कार्य मंत्रालयाच्या वतीने ट्रायफेड महाराष्ट्र राज्यात हा पहिलाच प्रकल्प राबवत आहे. ट्रायफूड पार्क सुरू झाल्याने शेकडो आदिवासी हातांना रोजगार मिळून त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल. त्यासंदर्भात उपविभागीय दंडाधिकारी राहुल मुंडके, तहसीलदार विजय तळेकर, प्रकल्प अधिकारी शशिकला अहिरराव, प्रादेशिक व्यवस्थापक मयूर गुप्ता ट्रायफेड यांच्याशी चर्चा करुन लवकरच काम पूर्ण करण्याचे आदेश मंत्री महोदया रेणुका सिंह यांनी दिले. या ट्रायफूड प्रकल्पामध्ये आवळा, जांभूळ, सिताफळ यांच्यापासून विविध पदार्थ बनवणार आहे.