इगतपुरीनामा न्यूज, दि. १९
इगतपुरी तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागाला नवसंजीवनी देणाऱ्या कोरपगाव प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यान्वित करून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पदस्थापना करावी अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके यांनी केली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री ना. राजेश टोपे यांना भेटून कोरपगाव प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यान्वित करण्याचे साकडे त्यांनी घातले. आरोग्यमंत्री ना. टोपे यांनी तातडीने पदे मंजुरीबाबत निर्णय घेण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. ६ वर्षांपूर्वी माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके यांनी कोरपगाव प्राथमिक आरोग्य केंद्र उभारणीसाठी अविरत प्रयत्न केले होते. जागेची अडचण, बांधकामाचे निधी नियोजन, शासकीय सोपस्कार करून अखेर इमारत दिमाखात उभी राहिली. मात्र ही इमारत निव्वळ शोभेची वास्तू न बनता यामध्ये अत्यावश्यक आरोग्य सुविधा मिळाव्यात. पदे मंजुरी देऊन आरोग्य केंद्र कार्यान्वित करावे यासाठी गोरख बोडके आग्रही आहेत.
माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके यांनी आरोग्यमंत्री ना. राजेश टोपे यांच्याशी याबाबत सविस्तर संवाद साधला. त्यांनी सांगितले की, इगतपुरी तालुक्यातील कोरपगाव परिसरात अनेक आदिवासी वाडे पाडे आहेत. ह्या भागातील नागरिकांना आरोग्य सुविधा मिळण्यासाठी लांबवर जावे लागते. भौगोलिकदृष्ट्या अन्यत्र आरोग्य सुविधा मिळण्यासाठी अनंत अडचणी येतात. कोरपगाव हे मध्यवर्ती आणि रस्त्याला लागून असणारे गाव आहे. ह्या भागासाठी येथे ६ वर्षापूर्वी विविध अडचणींचा सामना करून आरोग्य केंद्राला मंजुरी मिळवली. जागेची अडचण दूर करण्यासाठी जलसंपदा विभागाकडून जागा प्राप्त करून घेतली. इमारत बांधकामासाठी निधी उपलब्ध करून इमारत सुद्धा पूर्ण झाली. कोरोना काळात ह्या इमारतीत कोविड सेंटर लोकांना उपयुक्त ठरले. आता कोरपगाव प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यान्वित होणे अत्यंत महत्वाचे आहे. त्यासाठी पदांना मंजुरी देऊन आरोग्य केंद्र लोकांसाठी तातडीने सुरू करणे आवश्यक आहे.
आरोग्यमंत्री ना. राजेश टोपे यांनी याबाबत तातडीने कार्यवाही करण्यात येईल असे सांगत संबंधित अधिकाऱ्यांना पदे मंजुरीबाबत सूचना दिल्या. माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके यांनी दूरदृष्टीने उभ्या केलेल्या आरोग्य केंद्राच्या कामाबद्धल ना. टोपे यांनी यावेळी कौतुक केले. यांच्यासोबत माजी आमदार जयंत जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष रविंद्र पगार, नाशिक लोकसभा जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, युवा जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग आदी हजर होते.