इगतपुरीनामा न्यूज, दि. २०
मालुंजे ता. इगतपुरी येथील लग्न सोहळ्यात १५० ते २०० वऱ्हाड्यांना बोलावणे अनेकांना चांगलेच भोवले आहे. कोरोना पसरवण्यासाठी कारणीभूत ठरल्यासह विविध कायद्यांचा भंग केल्याप्रकरणी अखेर ७ लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाडीवऱ्हे पोलिसांनी गंभीर दखल घेऊन साथरोग प्रतिबंधक कायद्यानुसार संबंधितांवर आज गुन्हा दाखला केला. यामुळे अनेकांचे धाबे दणाणले असून इगतपुरी तालुक्यात खळबळ माजली आहे. १५ मार्चला मालुंजे येथे झालेल्या लग्नात नवरदेवासह १६ जण कोरोना बाधित झाल्याप्रकरणी ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, अनिता दशरथ गायकर, कोमल दशरथ गायकर, रोशनी दशरथ गायकर, सागर पांडुरंग मालुजंकर, पांडुरंग मालुजंकर सर्व रा. मालुंजे, ता. इगतपुरी, सागर ज्ञानेश्वर गव्हाणे, ज्ञानेश्वर गव्हाणे यांनी कोरोना ह्या संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव असल्याचे माहीत असूनही लग्न सोहळ्याचे आयोजन केले. १५ मार्चला झालेल्या लग्न सोहळ्यासाठी वाडीवऱ्हे पोलीस ठाणेकडुन कोणतीही पुर्व परवानगी घेतली नाही. गावचे पोलीस पाटील यांनाही देखील कोणतीही पुर्व सुचना न देता कार्यक्रमाला सुमारे १५० ते २०० लोकांना बोलावले. जिल्हाधिकारी नाशिक यांनी दिलेल्या कोणत्याही प्रकारच्या अटी व शर्तीचे पालन न करता लग्नसोहळयाचा कार्यक्रम घेण्यात आला. शासनाच्या आदेशांचे उल्लंघन करण्यात आले. हयगय आणि अविचाराने मानवी जीवितासह व्यक्तिगत सुरक्षा धोक्यात येईल असे कृत्य केले. नियमापेक्षा जास्त लोक लग्नास जमा करून उपस्थित लोकांना संसर्ग पसरवण्यासाठी हयगयीची घातक कृती करून शासनाच्या आदेशाचा भंग केला म्हणुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासनातर्फे अभिजीत अशोक खांडरे, वाडीवऱ्हे पोलीस ठाणे यांनी फिर्याद दिली.
भारतीय दंडविधान संहितेच्या कलम १८८, २६९, २७० अन्वये आणि साथरोग प्रतिबंधक अधिनियम १८९७ चे कलम २, ३, ४ प्रमाणे अनिता दशरथ गायकर, कोमल दशरथ गायकर, रोशनी दशरथ गायकर, सागर पांडुरंग मालुजंकर, पांडुरंग मालुजंकर सर्व रा. मालुंजे, ता. इगतपुरी, सागर ज्ञानेश्वर गव्हाणे, ज्ञानेश्वर गव्हाणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक विश्वजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली डी. जी. फड, सोमनाथ बोराडे आदींनी तपास सुरू केला आहे. दरम्यान ह्या प्रकरणामुळे अनेकांचे धाबे दणाणले असून भीतीमुळे लग्नसोहळे बंद होणार असल्याचे चर्चिले जात आहे.
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group
4 Comments