इगतपुरीनामा न्यूज, दि. १०
मोदी सरकारने देशभरात विकासाच्या कामांचा सपाटा लावला आहे. त्यामुळे युवक वर्ग मोठ्या संख्येने भाजपा- रिपाई मित्रपक्षांकडे आकर्षित झाला आहे. नाशिक महापालिकेसह जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका तोंडावर आहेत. गोरगरीब जनतेच्या न्याय हक्कासाठी रिपाई नेहमीच पुढे राहिली आहे. गाव तेथे रिपाईची शाखा उघडून जनतेला न्याय मिळवून द्यावा. आगामी निवडणुकांमध्ये रिपाईचा झेंडा फडकवा असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री नामदार रामदास आठवले यांनी केले.
विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी ना. रामदास आठवले शिर्डी, राहता याठिकाणी जात असतांना इगतपुरी येथील मानस हॉटेल या ठिकाणी मोजक्या रिपाई पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली. त्यावेळी ते मार्गदर्शन करतांना बोलत होते. यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय पदाधिकारी राजेंद्र गुप्ता राज्यभरातील कामकाजाचा आढावा देत आगामी निवडणुकांसाठी व्यूहरचनेची माहिती दिली. इगतपुरी तालुका रिपाई अध्यक्ष सुनील रोकडे यांनी इगतपुरी शहर व तालुक्याचा आढावा दिला. यावेळेस मंत्री आठवले यांचा सत्कार करण्यात आला. ना. आठवले यांनी इगतपुरी तालुक्यात होत असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या बांधणीबद्दल राजेंद्र गुप्ता व सुनील रोकडे यांच्या कामकाजाचे कौतुक केले. यावेळी जितू दोंदे, सोनू रोकडे, सुरेश भडांगे, संदीप जगताप, पोपट दोंदे यांच्यासह कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते