शिक्षण सागरातील कोलंबस : डॉ. मो. स. गोसावी

लेखन – प्रा. छाया लोखंडे – गिरी

गोखले एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्राचार्य डॉ. मो. स. गोसावी हे आज ८७ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. त्यानिमित्ताने एस. एम. आर. के. महिला महाविद्यालयातर्फे त्यांना अभिवादन..!

गोखले एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्राचार्य डॉ. मो. स. गोसावी यांचे व्यक्तिमत्व विविधतेने नटलेले आहे. गोखले एज्युकेशन संस्थेच्या अवकाशाला व्यापून पुरणारे त्यांचे व्यक्तिमत्व शिक्षण व्यवस्थापन, अध्यात्म, साहित्य या सर्व क्षेत्रात स्वकर्तृत्वाचा ठसा उमटवून ही सर्व क्षेत्रे व्यापून पुन्हा दशांगुळे उरणारे आहे. आज फक्त गोखले एज्युकेशन संस्थेपूरतेच मर्यादित नाही तर समाजातील अनेक घटकांना मार्गदर्शक आणि सहाय्यभूत ठरणारे असे आहे. शिक्षण क्षेत्रातील उत्तुंग व्यक्तिमत्व म्हणून आज त्यांच्याकडे पाहिले जाते. प्राथमिक ते विद्यापीठीय सर्व परीक्षांमध्ये सतत अव्वल स्थान कायम ठेवण्याची अजोड कामगिरी त्यांच्या बुद्धिमत्तेची साक्ष देते.

भारतातील ‘मॅनेजमेंट सायन्स’ या विषयाचे ते पहिले पीएचडी, साहित्याचार्य, हिंदी साहित्य रत्न, संस्कृत पंडित असा बहुमान मिळविणारे सर जर्मन भाषेतही पारंगत आहे. वयाच्या २३ व्या वर्षी त्यांनी प्राचार्य पदाची धुरा पेलून ३७ वर्ष बीवायके वाणिज्य महाविद्यालयाचे सर्वात तरुण प्राचार्य म्हणून प्रदीर्घ सेवाभावी असा विक्रम नोंदविला. सरांना शिक्षण क्षेत्राची आवड असल्याने या क्षेत्रात त्यांनी सतत नवे नवे प्रयोग केले. दुर्मिळ गोष्ट म्हणजे जसजसा काळ पुढे जातो तसतसे सरांच्या मनातील सर्जनशील कल्पना आणि उपक्रम बहरास येत असतात. ही दुर्मिळ गोष्ट गोखले एज्युकेशन संस्थेने पाहिली आहे.

बीवायके वाणिज्य महाविद्यालयाला सरांनी १९५८ ते १९९५ या कालावधीत आंतरराष्ट्रीय पातळीवर नेवून ठेवले. देशातील १५ हजार वाणिज्य महाविद्यालयांपैकी बीवायके वाणिज्य महाविद्यालयाला राष्ट्रीय पातळीवर नॅक संस्थेने ‘अ वर्ग’ देवून सन्मानित केले. देशातील आय.एस.ओ. १००१ – २०१५ हे आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र मिळालेले हे महाविद्यालय आहे. उच्च शिक्षणाला उद्योजकतेकडे नेण्यासाठी व विद्यापीठीय शिक्षणाला नवी दिशा देण्यासाठी द्रष्टेपणा, धडाडी, चिकाटी, नवनिर्मिती दाखवून त्यांनी विद्यापीठीय विशेषतः वाणिज्य विद्याशाखेत सर्व स्तरावरील शिक्षण संजीवक, परिणामकारक व प्रवाही करण्याचा आदर्श वस्तुपाठ देशामध्ये निर्माण केला.

सरांचे शैक्षणिक क्षेत्रातील महत्वाचे वैशिष्ठ्य म्हणजे त्यांनी व्यवस्थापन शिक्षणामध्ये दिलेले योगदान, व्यवस्थापन, प्रशासन या क्षेत्रात नवनवे प्रयोग व नवीन कार्यप्रणालीचे संशोधन आजही सतत सुरु असते. जणू सरांच्या बाबतीत नवनवोन्मेषशालिनी प्रज्ञा लाभलेले व्यक्तिमत्व असेच म्हणता येईल. ज्ञानेश्वरांपासून अनेकांनी वर्तनावर भर दिला आहे. ज्ञानेश्वर म्हणतात ‘मार्गांधारे वर्तावे’, संत तुकाराम म्हणतात ‘बोले तैसा चाले त्यांची वंदावी पाऊले’ याचाच अर्थ व्यक्ती जीवनात वर्तनाला अत्यंत महत्व आहे. सरांच्या स्वभावात वक्तशीरपणा, गुणग्राहकता हे असल्यामुळे सतत विद्यार्थ्यांना काहीतरी नवीन मिळाले पाहिजे या उदात्त हेतूने त्यांचे शैक्षणिक कार्य आजही अविरतपणे, तितक्याच जोमाने सुरु आहे. एक आत्मविश्वासू व बहुविध अनुभवाने समृध्द असा कार्यप्रवण, कर्तबगार तरुण बाहेर पडावा व तो आत्मनिर्भर व समाजोपयोगी व्हावा यावर त्यांचा सतत भर असतो.

व्यवस्थापन क्षेत्राबरोबरच उत्तर महाराष्ट्रातील महिलांच्या शिक्षणासाठी डॉ. मो.स. गोसावी ह्यांनी विशेष प्रयत्न केले. सरांच्या दूरदृष्टीमुळेच २८ जून १९८५ ला गोखले एज्युकेशन सोसायटी अंतर्गत एसएनडीटी महिला विद्यापीठाशी कायम संलग्न असलेल्या श्रीमती मंजुळाबाई रावजीसा क्षत्रिय कला व ललित कला ( एसएमआरके ) बाबूभाई कपाडिया ( बीके ) वाणिज्य आठवले कुलकर्णी ( एके ) गृह विज्ञान महिला महाविद्यालयाची स्थापना झाली. ह्यायोगे महिलांसाठी शिक्षणाचे नवे दालन उघडले गेले. हे महाविद्यालय आज गेली ३७ वर्षे स्त्रियांच्या सक्षमीकरणाचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून उत्तर महाराष्ट्रातील ३३ प्रकारचे अभ्यासक्रम एकाच छताखाली राबविणारे सर्वप्रथम व एकमेव कॉलेज ठरले आहे. एसएमआरके महाविद्यालय हे केवळ नाशिकमध्येच नाही तर संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात नावाजलेले महाविद्यालय आहे. दर्जेदार शिक्षणातून महिलांचा सर्वांगीण विकास करणे हे ध्येय समोर ठेवून महाविद्यालयाची दैदिप्यमान वाटचाल सुरू आहे.

महाविद्यालयाच्या संस्थापक प्राचार्या डॉ. सुनंदाताई गोसावी ह्यांनी महाविद्यालयात आपुलकीचे शिस्तबध्द पण मोकळे वातावरण निर्माण केले. विद्यार्थीनींच्या कलागुणांना वाव मिळेल असे उपक्रम सुरू केले. त्यांनी घालून दिलेल्या आदर्श वस्तुपाठाच्या बळावर महाविद्यालयाने यशस्वी वाटचाल केली. सरांच्या कन्या आणि महाविद्यालयाच्या विद्यमान प्राचार्या डॉ. दीप्ती देशपांडे २००५ पासून एसएमआरके महाविद्यालयाच्या प्राचार्या झाल्या. त्यांनी गेल्या १६ वर्षात महाविद्यालयाच्या प्रगतीला आपल्या कालसुसंगत धोरणाने व सक्षम नेतृत्वाने योग्य दिशा दिली। विद्यार्थीनींसमोर आपल्या समृध्द व्यक्तिमत्त्वाचा आदर्श निर्माण केला. त्यांच्या नेतृत्वामुळे महाविद्यालयाने अनेक पुरस्कार प्राप्त केले आहेत. गोखले एज्युकेशन सोसायटीचा बेस्ट इन्स्टिट्यूशन तसेच फाईव्ह स्टार क्वालिटी अँड एक्सलन्स अवार्ड ने सन्मानित करण्यात आले आहे. महाविद्यालयाला सर्वच क्षेत्रात सर्वोच्च स्थानावर नेण्यात त्यांचा अमूल्य वाटा आहे.

नाशिकमध्ये फारसे उपलब्ध नसलेले अभ्यासक्रम इथे एकाच ठिकाणी आढळतात. होमसायन्स या शाखेत फूड सायन्स अँड न्यूट्रिशन, टेक्सटाइल सायन्स अँड ऍपरल डिझायनिंग, ह्यूमन डेव्हलपमेंट रिसोर्स मॅनेजमेंट हे पदवी अभ्यासक्रम सर्टिफिकेट कोर्स इन इंटिरियर डिझाइन अँड डेकोरेशन, सर्टिफिकेट कोर्स इन गारमेंट मॅन्युफॅक्चरिंग अँड फॅशन डिझायनिंग,सर्टिफिकेट कोर्स इन कॉम्प्युटर बेस्ड फॅशन डिझायनिंग आदी अभ्यासक्रम सुद्धा उपलब्ध आहेत. कॉमर्स शाखेत कॉम्प्यूटर ऍप्लिकेशन, अकाऊंटिंग अँड ऑडिटींग, मॅनेजमेंटमध्ये ( बीएमएस ) बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज ह्यूमन रिसोर्स मॅनेजमेंट असे पर्याय उपलब्ध आहेत. कला शाखेत मराठी, हिंदी समाजशास्त्र ट्रॅव्हल अँड टुरिझम तर फाइन आर्टसमध्ये म्युझिक अँड ड्रॉइंग, पदव्युत्तर मध्ये कला शाखा, कॉमर्स, फाइन आर्टस मध्ये एम. ए. इन म्यूझिक इ. अभ्यासक्रम आहेत. ह्या शैक्षणिक वर्षात महाविद्यालयातील आहार विज्ञान ह्या विषयात पदव्युत्तर पदविकेसाठी विद्यापीठाची मान्यता मिळाली आहे. महाविद्यालयातील कनिष्ठ महाविद्यालयातही विविध विषय विद्यार्थिनींसाठी आहेत. होम सायन्स, आर्टस, कॉमर्स, सायन्स, व्होकेशनल कोर्स- ज्या मध्ये दुरिझम अँड हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट आणि फूड प्रॉडक्शन अँड टेक्नॉलॉजी असे विषय आहेत.

सरांच्या प्रेरक मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाचे वर्धिष्णू अस्तित्व आकार घेत आहे. सरांनी संस्थेमध्ये निर्माण केलेल्या ऊर्जात्मक वातावरणामुळे एसएमआरके महिला महाविद्यालयातही केवळ अभ्यासक्रमच नव्हे तर विद्यार्थिनींच्या समाजाभिमुख व्यक्तिमत्वाची जडणघडण करण्यात येते. मो.स. गोसावी म्हणजे चालतीबोलती शिक्षण संस्था. सरांचे अहर्निश उदात्त कार्य सदैव प्रेरणा देत आहे आणि असेच देत राहणार. आज सर ८७ व्या वर्षात पदार्पण करत आहेत. त्यांना एसएमआरके परिवारातर्फे अनंत शुभेच्छा व अभिवादन..!

लेखिका प्रा. छाया लोखंडे - गिरी ह्या एसएमआरके महिला महाविद्यालय, नाशिक येथे कार्यरत आहेत. 
त्यांचा संपर्क क्रमांक ९८२२८७९४६४ आहे.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!