लेखन : डॉ. कल्पना श्रीधर नागरे, मानसशास्त्रज्ञ
वाचकांनो, कधी कधी तुम्ही एकदम गाढ झोपेत असताना कोणीतरी तुम्हाला धक्का दिल्याचा, उडी मारल्याचा भास होतो आणि जाग येते असे कधी झाले आहे का ? १०० पैकी ७० लोकांचे उत्तर होय असेच असणार. साधारणतः झोपेच्या दुसऱ्या अवस्थेत म्हणजे गाढ झोपेत हा प्रकार जाणवतो. बऱ्याचदा स्वप्नात कोणी तरी धक्का मारत किंवा उंचावरून खाली पडत असल्याचे स्वप्न पडते आणि व्यक्तीला प्रत्यक्षात देखील स्नायूंना झटका बसून जाग येते. अशा अवस्थेला हिपनिक जर्क म्हटले जाते. आजच्या लेखात जाणुन घेऊया हिपनिक जर्क काय आहे ?
कधी गाढ झोपेत अचानक हिसका लागुन तुम्हाला जाग आली आहे का ? तुम्ही झोपेत उडी मारल्याचा भास तुम्हाला होतो का ? घाबरु नका…हे दुसरे तिसरे काही नसुन हिपनिक जर्क आहे. हिपनिक जर्क हा कोणताही आजार नाही किंवा हिपनिक जर्क हा मज्जासंस्थेचा विकारही नाही. हा फक्त झोपेत शरीराला किंवा स्नायुंना बसलेला हिसका आहे. जो फक्त झोप लागल्यानंतर पहिल्या काही तासात जाणवतो. याला झोपेत बसलेला हिसका ( स्लीप ट्विच ) किंवा मायोक्लोनिक जर्क असेही म्हणतात. याबाबत अनेक सामान्य गैरसमज आहेत. सामान्यत: जगातील ७० टक्के लोकांना हिपनिक जर्कचा अनुभव येतो.
झोपेत हिपनिक जर्क बसण्याची नेमकी कारणे कोणती आहेत ?
यासंदर्भात अनेक संशोधने केली गेली असुनही अद्याप याचे नेमके कारण अज्ञात आहे. मात्र अशी विविध कारणे आहेत ज्यामुळे हिपनिक जर्कचा धोका संभवतो. जर तुम्ही चिंता किंवा काळजीने त्रस्त असाल तर अशावेळी हिपनिक जर्कचा अनुभव तुम्हाला मिळु शकतो. झोपण्यापुर्वी दारु किंवा कॅफेनचे सेवन केल्यास हिपनिक जर्क ची शक्यता वाढते. त्यामुळे झोपण्यापुर्वी या गोष्टींचे सेवन टाळा. संध्याकाळी उशीरा केलेल्या व्यायामामुळे, कॅल्शियम, मॅग्नेशियम किंवा लोह ( आयर्न ) च्या कमतरतेमुळे झोपेत हा असा अचानक हिसका बसू शकतो. गाढ झोपेत शरीर आराम करीत असले तरी मेंदुचा काही भाग मात्र सक्रिय असतो. त्यामुळे झोपण्याची चुकीची पद्धत किंवा अर्धवट झालेल्या झोपेमुळे शरीराला हा हिसका बसू शकतो. सातत्याने अति प्रमाणात केलेले औषधांचे सेवन किंवा उपचारपद्धती यामुळे हिपनिक जर्कचा त्रास होवू शकतो.
हिपनिक जर्क का आणि कशामुळे लागतो ?
बहुतेक वेळा जेव्हा तुम्ही पटकन झोपी जाता तेव्हा हिपनिक जर्क लागतो. झोपेच्या पहिल्या टप्यात श्वास आणि ह्रदयाचे ठोके हळुहळु मंद होवू लागतात. मात्र खुप दमलेल्या अवस्थेत जेव्हा तुम्ही पटकन झोपी जाता तेव्हा मेंदू हा झोपेचा टप्पा पटकन ओलांडतो. या दरम्यान स्नायु शिथिल होतात. मात्र मेंदू सक्रिय असतो. त्यामुळे आपल्याला अचानक घसरल्याचा भास होतो. रासायनिक प्रक्रिया घडून हा संदेश मेंदूला पोहचतो व तुम्हाला जाग येते. काही वेळा मॅग्नेशियम, कॅल्शियम, विटॅमिन बी १२ या पोषणमुल्यांच्या कमतरतेमुळे सुद्धा हिपनिक जर्क झोपेत लागल्याचा अनुभव येतो.
जर या झोपेत अचानक लागणाऱ्या या हिसक्यापासून तुम्हाला बचाव करायचा असेल तर खालील गोष्टींचे जरुर पालन करा.
१. दररोज रात्री संपुर्ण आठ तास झोप घ्या.
२. दररोज सकाळी ठरलेल्या वेळी उठण्याचा प्रयत्न करा.
३. झोपी जाण्यापूर्वी कमीतकमी सहा तास आधी व्यायाम करण्याचे टाळा.
४. झोपण्यापूर्वी काही काळ आरामात घालवा. यासाठी गरम पाण्याने आंघोळ करा किंवा एखादे पुस्तक वाचा. ५. झोपण्यापुर्वी सोडा, कॉफी सारखी उत्तजेक पेये घेणे टाळा. त्याऐवजी कोमट दूध झोपण्यापूर्वी प्या. जेणे करुन शांत झोप लागेल
६. धुम्रपान, मद्यपानापासुन दुर रहा.
७. सायंकाळी किंवा झोपताना चिंता, काळजीचे विचार करणे टाळा.
८. आहारात मुबलक प्रमाणात मॅग्नेशियम, कॅल्शियम घ्या. पोषक व संतुलित आहार घ्या. गोड आणि मीठाचा वापर कमी करा. त्याऐवजी भरपूर ताज्या भाज्या व फळे आहारात असू द्या.
९. हिपनिक जर्कमुळे तुमची झोपमोड होत असेल तर त्वरित तुमच्या डॉक्टरांसोबत याविषयी चर्चा करा.
हिपनिक जर्क वर काही उपाय आहे का ?
हिपनिक जर्क लागण्याचे कारण अज्ञात असल्याने त्यावर कोणताही उपाययोजना उपलब्ध नाही. बऱ्याचदा झोपेच्या समस्येमुळे सुदृढ माणसांमध्येही याची लक्षणे दिसुन येतात. मात्र असे निर्दशनास आले आहे की, उत्तेजक पदार्थांचे सेवन टाळल्यामुळे, झोपेचे योग्य नियोजन केल्यामुळे तसेच संध्याकाळी तणावात्मक शारिरीक हालचाली टाळल्याने हिपनिक जर्कचे प्रमाण कमी होऊ शकते.
लेखिकेचा संपर्क क्रमांक 9011720400
असून त्या चिकित्सा आणि बाल मानसशास्त्रज्ञ आहेत. त्यांची विविध पुस्तके प्रसिद्ध आहेत.