इगतपुरीनामा न्यूज दि. ११ :
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या नाकर्तेपणामुळे इगतपुरी शहराचा काही भाग रात्रभर अंधारात असून आठ तास उलटूनही विद्युतपुरवठा सुरळीत होत नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.
इगतपुरी शहर आणि परिसरात विजेचे अघोषित भारनियमन नित्याचेच झाले असून अनेकदा सांगूनही यावर काहीही उपाययोजना केली जात नसल्याने संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी इगतपुरीवासियांनी केली आहे.
काल रात्री उशिरा कदाचित तांत्रिक बिघाड झाल्यामुळे शहरातील काही भागातील वीजपुरवठा खंडित झाला आहे. विद्युत वितरण कंपनीच्या यंत्रणेकडून मात्र याबाबत कुठलेही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आले नसून संपर्काचा प्रयत्न केला असता कार्यालयातील दूरध्वनी नेहमीप्रमाणे बंद करून ठेवण्यात आला आहे. इगतपुरी शहर आणि परिसरात वेळीअवेळी विद्युत पुरवठा खंडित होणे ही नित्याचीच बाब असून विद्युत पुरवठा नक्की कशामुळे खंडित झाला, तो कधी पूर्ववत होणार याबद्दल शहर वासियांना कोणतीही माहिती दिली जात नाही. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना याचे गांभीर्य नसल्याने शहराचा विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असतांनाही कोणत्याही उपाययोजना केल्या जात नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी आणि कर्मचारी नेहमीच मनमानी करत असून तातडीने कारवाई केली जावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.