इगतपुरीनामा न्यूज, दि. ९
जागतिक आदिवासी दिनानिमित्त इगतपुरी तालुक्यातील बारशिंगवे येथे दिव्यांग उद्योग केंद्रात कोरोना प्रतिबंधक लसीकरण व जनजागृती शिबीर संपन्न झाले. जिल्हा परिषद आरोग्य विभाग अंतर्गत प्राथमिक आरोग्य खेड व अधरवड उपकेंद्र, ग्रामपंचायत बारशिंगवे यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद सदस्य हरिदास लोहकरे यांच्या सूचनेनुसार ह्या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार आज जागतिक आदिवासी दिनानिमित्त सकाळी 10 वाजता आदिवासी क्रांतिकारक व महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून जागतिक आदिवासी दिनाचे महत्व विशद करण्यात आले. शिबिराचे औपचारिक उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य हरिदास लोहकरे यांनी करून लसीकरणास सुरुवात करण्यात आली.
आदिवासी भागात कोरोनाच्या लसीसंदर्भात असणाऱ्या अफवा व गैरसमज जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने तसेच जिल्हा परिषद सदस्य हरिदास लोहकरे यांनी यापूर्वीच वेळोवेळी दूर करण्याचे काम केले आहे. त्यास आजच्या शिबिरातून चांगला प्रतिसाद दिसला. सकाळ पासूनच लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी मोठी गर्दी दिसून आली. यावेळी तरुण आदिवासी बांधवांनी लस घेण्यासाठी मोठी गर्दी केली. परिसरातील बहुसंख्य दिव्यांग बांधवांनीही यावेळी लस घेतली.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य हरिदास लोहकरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख, खेडचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गुप्ता, बारशिंगवेचे सरपंच वसंत बोराडे, उपसरपंच पोपट लहामगे, ट्रायबल फोरमचे जिल्हाध्यक्ष संपत रोंगटे, दिव्यांग केंद्राचे अध्यक्ष शिवाजी बोराडे, सचिव कमलाकर सांबरे, विक्रम भांगे, दत्तू पेढेकर, माजी सरपंच गुलाब भले, बाळू झोले, संपत फोडसे, पंढरी कातोरे, गोविंद खादे, भास्कर घाणे, श्रीराम घाणे, सतीश बांबळे, ग्रामसेवक शरद केकान, ग्रामपंचायत सदस्य, प्रा. आ. केंद्र व अंतर्गत उपकेंद्राचे सर्व कर्मचारी,आशा वर्कर,अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी आणि बहुसंख्य आदिवासी बांधव उपस्थित होते.
दरवर्षी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करून जागतिक आदिवासी दिन साजरा केला जातो. परंतु कोरोना महामारीच्या या कठीण काळात ही साथ आटोक्यात येऊन त्यापासून रक्षण करण्यासाठी लस महत्वाची आहे. त्यामुळेच लसीकरण आयोजित केले. जनजागृतीमुळे लसीकरण करून घेण्यास चांगला प्रतिसाद मिळाला.
- हरिदास लोहकरे, जिल्हा परिषद सदस्य
कोरोना महामारीवर लस हाच एकमेव प्रभावी उपाय आहे. आदिवासी दिनाच्या निमित्ताने आदिवासी बांधवांनी चांगला सहभाग घेऊन लस घेतली. जिल्हा परिषद सदस्य हरिदास लोहकरे यांच्या संकल्पनेनुसार हे भव्य शिबिर संपन्न झाले. कोरोना पासून बचावासाठी सर्वांनी लस घेणे आवश्यक आहे.
- डॉ. एम. बी. देशमुख, तालुका आरोग्य अधिकारी इगतपुरी