
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील मोडाळे, शिरसाठे व कुशेगाव या गावांना जोडणाऱ्या मुख्य रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने विद्यार्थी, कामगार आणि ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ‘रस्त्यात खड्डे की खड्ड्यांत रस्ता’ असा संतप्त सवाल त्रस्त नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. या परिसरातील अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी, तर कामगार रोजगारासाठी दररोज याच रस्त्याने ये-जा करतात. मात्र, रस्त्यावरील चाळण झालेल्या या स्वरूपामुळे प्रवास करणे अत्यंत जिकिरीचे बनले आहे. विशेषतः दुचाकीस्वारांना खड्डे चुकवताना दररोज अपघाताचा धोका पत्करावा लागत असून, वाहनांचेही मोठे नुकसान होत आहे. पावसाळ्यात तर या रस्त्याची अवस्था आणखीच बिकट झाली आहे. ग्रामीण भागातील या गंभीर समस्येकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते विकास शेंडगे यांनी स्थानिक आमदार हिरामण खोसकर यांना निवेदन देऊन रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची आक्रमक मागणी केली आहे. विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान, कामगारांची दैनंदिन गैरसोय आणि ग्रामस्थांचा त्रास लक्षात घेता संबंधित प्रशासकीय विभागाला तातडीने दुरुस्तीचे आदेश द्यावेत, असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे. “ग्रामीण भागातील नागरिकांच्या दळणवळणाचा हा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. त्यामुळे आमदार हिरामण खोसकर यांनी वैयक्तिक लक्ष घालून या रस्त्याच्या खड्डेमुक्ती व दुरुस्तीसाठी तातडीने पुढाकार घ्यावा आणि परिसरातील नागरिकांना दिलासा द्यावा,” अशी आग्रही अपेक्षा विकास शेंडगे यांनी व्यक्त केली आहे.