
इगतपुरीनामा न्यूज – १३ नोव्हेंबरच्या रात्री चारचाकी व मोटार सायकलवर आलेल्या अज्ञात ८ आरोपींनी संगनमत करून गिरणारे येथे फिर्यादीच्या गाडीला डॅश मारला. त्यांनी चॉपरचा धाक दाखवून पैशाची मागणी करून अंगावर गाडी घातली. यासह पोलीस अंमलदाराच्या अंगावर गाडी घालून ठार मारण्याचा प्रयत्न केला. मुंगसरे रोडवरील किनारा हॉटेल येथे जेवणाचे बिलावरून वाद घालत हॉटेलची तोडफोड करून पार्किंग मधील चारचाकी वाहनांचे काचा फोडल्या. याबाबत नाशिक तालुका पोलीस ठाण्यात येथे गु.र.नं. १९०/२०२५ बीएनएस १०९, ३१०(२), ३५१(२), ३५२, ३२४(४) प्रमाणे गुन्हा दाखल आहे. ह्या गुन्ह्यातील सर्व मुख्य आरोपी गुन्हा घडल्यापासून फरार होते. त्यानुषंगाने ह्या गुन्ह्याच्या समांतर तपासात स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने गुप्त बातमीनुसार आरोपी १) गणेश रतन सोनवणे, २) अभिजीत अनिल वाघ, रा. मखमलाबाद शिवार, ता. जि. नाशिक यांना शिताफीने ताब्यात घेतले. त्यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी व त्यांच्या इतर साथीदारांनी मिळून हा गुन्हा केल्याची कबूली दिली. स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक रविंद्र मगर, पोलीस अंमलदार प्रविण काकड, संतोष दोंदे, नवनाथ शिरोळे, रावसाहेब कांबळे यांनी ही धडक कारवाई यशस्वी केली. नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांनी त्यांना मार्गदर्शन केले होते.