
इगतपुरीनामा न्यूज : इगतपुरी येथील संजीवनी माध्यमिक आश्रमशाळेत राजमाता जिजाऊ आईसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. मुंबई येथील राजीव मोरे फाऊंडेशनचे अध्यक्ष वैभव मोरे हे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना यावेळी फाऊंडेशनकडून विविध प्रकारची वाचनीय पुस्तके आणि खेळ साहित्य भेट स्वरूपात प्रदान करण्यात आले. राजीव मोरे फाऊंडेशन ही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजांवर गेली काही वर्षे सातत्याने भरीव काम करत आहे, यापुढेही ते असेच अविरत सुरू राहील अशी माहिती फाऊंडेशन चे अध्यक्ष वैभव मोरे यांनी यावेळी दिली. मुलांच्या विविध शैक्षणिक गरजा ओळखून विद्यार्थ्यांनी पाठ्य पुस्तकांसोबतच अवांतर वाचनाकडेही आवर्जून लक्ष द्यावे असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी फाऊंडेशनचे सदस्य अश्विनी मोरे, भूषण मोरे, विनमा मोरे आदींसह आश्रम शाळेचे मुख्याध्यापक मनोज गोसावी, शिक्षक वैभव तुपे, सचिन बस्ते आदी उपस्थित होते.
