इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुका कृषी विभागामार्फत रब्बी हंगामात पेरणी पूर्व बीज प्रक्रिया मोहीम राबिण्यात येत आहे. गव्हाचे सरासरी क्षेत्र १३२३ हेक्टर असून आतापर्यंत ४४४ हेक्टर पेरणी झाली. हरभऱ्याचे सरासरी क्षेत्र ९३० हेक्टर असून आतापर्यंत ३३६ हेक्टर पेरणी झाली आहे अशी माहिती इगतपुरीचे तालुका कृषी अधिकारी रामदास मडके यांनी दिली. इगतपुरी तालुक्यात यावर्षी चांगले पर्जन्यमान झाले आहे. परिणामी गहू आणि हरभरा पिकाच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी आपल्याकडील पारंपरिक बियाणे न वापरता नवनवीन वाणांचा वापर करावा यासाठी कृषी विभागाने गहू, हरभरा बियाणे अनुदानावर विक्रीसाठी उपलब्ध करून दिले आहे. तालुका कृषी अधिकारी रामदास मडके यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली मंडळ कृषी अधिकारी मनोज रोंगटे, संतोष सतदिवे, किशोर भरते यांनी शेतकऱ्यांना हरभरा बियान्यांना ट्रायकोडरमा, रायजोबियम, स्फुरद विरघळणारे जिवाणू ( PSB )आणि गहू बियाण्यांना कॅप्टन, थायरम, अझाटोबॅक्टर यांची बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक करून दाखविले.
पिकांना जमिनीतून व बियाणे पासून होणारे रोग, किडींचा प्रादुर्भाव कमी करणे, जोमदार व निरोगी वाढीसाठी बीज प्रक्रिया हे अत्यंत प्रभावी साधन आहे. बीज प्रक्रिया ही रोग नियंत्रणाची अतिशय साधी सोपी कमी खर्चाची आणि परिणामकारक पद्धत आहे. या प्रक्रियेमुळे रोग जतूंचा नाश होऊन बियाण्याची उगवण क्षमता वाढते. रोपटे जोमदार निपजते. रोग झाल्यानंतर नियंत्रणासाठीच्या खर्चात बचत होते. कुशेगाव, मोडाळे, कावनई, सातूर्ली, पाडळी देशमुख, बारशिंगवे, अडसरे, मांजरगाव, आंबेवाडी, साकुर, मोगरे, धारगाव, वाळविहिर, वाघ्याचीवाडी, बोरली, भावली खुर्द, माणिकखांब, वाकी, तारांगणपाडा, पिंप्री सदो, नांदगाव सदो आदी गावांमध्ये कृषी सहाय्यक विजय कापसे, शांताराम गभाले, मनोहर टोपले, मोहिनी चावरा, चेतना चव्हाण, संगीता जाधव, मोनिका जाधव, रुपाली बिडवे, विद्या फुसे, हर्षदा गिळंदे, मोनिका गिळंदे, मंगेश कोकतारे, हेमराज देशमुख, योगेश दाते, पुंडलिक भोये, शिवचरण कोकाटे यांनी प्रात्यक्षिक केले.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान ( कडधान्य ) अंतर्गत हरभरा पिकाचे अडसरे, मांजरगाव,आंबेवाडी, शेनवड बुद्रुक, मोगरे, कुऱ्हेगाव, नांदूर वैद्य, धारगाव, माणिकखांब, सोमज या दहा गावांमध्ये प्रत्येकी १० हेक्टरचे प्रकल्प असे एकूण १०० हेक्टर चे राबविण्यात येत आहेत. प्रति हेक्टरी ७० किलो ग्रॅम पीडिकेवी कनक जातीचे बियाणे, इतर कृषी निविष्ठा शेतकऱ्यांना पुरवण्यात आल्या आहेत. ह्या शेतकऱ्यांचे माती नमुने देखील तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.
- किशोर भरते, कृषी पर्यवेक्षक इगतपुरी