ॲडव्हेंचर एज्युकेशनल टूर व वेबग्योर स्कुलतर्फे अतिदुर्गम धामडकीवाडीत विविध सामाजिक उपक्रम

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील अतिदुर्गम आदिवासी भागातील धामडकीवाडी येथे ॲडव्हेंचर एज्युकेशनल टूर दहिसर यांच्या समन्वयाने ऐरोली नवी मुंबई येथील वेबग्योर स्कुलच्या शिक्षक व विद्यार्थ्यांनी धामडकीवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला भेट दिली. वाडीतील महिलांनी आदिवासी परंपरेनुसार लोकगीताद्वारे पाहुण्यांचे स्वागत केले. शाळेचे मुख्याध्यापक तथा राज्य आदर्श शिक्षक प्रमोद परदेशी यांनी प्रास्ताविकातून शाळेची माहिती व वाडीच्या लोकजीवनाची माहिती दिली. वेबग्योर स्कुल शिक्षक व विद्यार्थी यांनी दुर्गम भागातील शैक्षणिक उपक्रम समजून घेतले. वाडीतील कुटुंबांना भेट देऊन लोकजीवन बाबत सर्व्हेक्षण करून धामडकीवाडीतील ग्रामस्थांना किराणा साहित्य वाटप केले. स्वच्छता व आरोग्य बाबत जनजागृती केली. नृत्य व विविध कलागुण सादर करून विद्यार्थ्यांचे मनोरंजन केले. वेबग्योर स्कुलच्या प्राचार्य हजरा सुर्वे व सर्व शिक्षकवृंद इंटरनॅशनल स्कुल ऐरोली मुंबई यांनी शाळेचे मुख्याध्यापक प्रमोद परदेशी यांचे शैक्षणिक व सामाजिक कामाचे कौतुक करून शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह देऊन सन्मान केला. शाळेसाठी शैक्षणिक खेळणी किट, खेळ साहित्य वाटप करून, विद्यार्थी व सर्व ग्रामस्थांना भरपेट सॅन्डविच, ज्युस, चॉकलेट व भेटवस्तू दिल्या. याप्रसंगी गोकुळ आगीवले, खेमचंद आगीवले, देवजी आगीवले, चांगुणा आगीवले, बबन आगीवले, मुन्ना तेलम, वामन हंबीर, व ग्रामस्थ उपस्थित होते. वेबग्योर इंटरनॅशनल स्कुल ऐरोली व ॲडव्हेंचर एज्युकेशनल टूर यांचे वंदना भगत यांनी वाडीतर्फे आभार मानले.

Similar Posts

error: Content is protected !!