किरण घायदार : इगतपुरीनामा न्यूज – प्रभू श्रीराम आणि रामायण हे प्रत्येक हिंदू माणसाच्या मनातील श्रद्धास्थान आहे. आदिवासी वारली चित्रशैलीत रामायणातील प्रसंग भाजपचे नेते व प्रवक्ते लक्ष्मण सावजी यांच्या महात्मा नगरमधील नवीन वास्तूच्या दर्शनी भिंतीवर नुकतेच साकारण्यात आले आहेत. विक्रमगड येथील कृष्णा भुसारे या आदिवासी युवा चित्रकाराने वारली चित्रशैली तज्ज्ञ संजय देवधर यांच्या मार्गदर्शनाखाली ६ दिवसात हे २० फूट लांबीचे भित्तिचित्र साकारले आहे. साधारण वर्षभरापूर्वी लक्ष्मण सावजी यांनी नवीन वास्तू घेतली. तेव्हाच त्यांच्या मनात प्रभू रामचंद्र चित्ररुपात आपल्या वास्तूत असावेत अशी कल्पना आली. त्यांनी आपले स्नेही संजय देवधर यांच्याशी संपर्क साधला. आदिवासी वारली चित्रशैलीत रामायण साकारण्याचे निश्चित करण्यात आले. जानेवारी महिन्यात अयोध्येत राममंदिर उभे राहिले व रामलल्लाची प्रतिष्ठापना झाली. त्यावेळी कल्पना अधिकच बळकट झाली. दरम्यान वास्तू पूर्णत्वाला आली. विक्रमगड येथील कृष्णा भुसारे याला बोलावून त्याला हे काम देण्यात आले. संजय देवधर यांनी मार्गदर्शनाखाली हे भित्तिचित्र पूर्ण करून घेतले. या भित्तिचित्राने वास्तूत सकारात्मक ऊर्जा निर्माण झाल्याची व भिंत बोलकी झाल्याची भावना सौ. उर्मिला, नुपूर व सावजी परिवाराने व्यक्त केली.
वाल्मिकी ऋषी रामायण लिहीत आहेत या प्रसंगापासून सुरुवात करण्यात आली आहे. राम, लक्ष्मण,भरत व शत्रुघ्न हे चौघे बंधू वशिष्ठ ऋषींच्या आश्रमात राहून शिक्षण घेतात. राम सीतेचा विवाह होतो. नंतर ते लक्ष्मणासह वनवासासाठी नाशिकला पंचवटीत येतात. पुढे हनुमान भक्ती व शबरी भेटीचे प्रसंग दिसतात. प्रभू श्रीराम अयोध्येत परत येतात. त्यांचे गुढ्या तोरणांनी मंगलमय वातावरणात स्वागत होते. हे सर्व प्रसंग सुंदर चित्रांमध्ये गुंफलेले आहेत. अखेरीस मोठ्या आकारात राममंदिर आणि आनंदीत झालेले अयोध्यावासी रेखाटण्यात आले आहेत. वृक्ष, वेली, निसर्ग, पशूपक्षी या रेखाटनांनी सचित्र रामायणात सुंदर भर घातली आहे. कृष्णा भुसारे या हरहुन्नरी आदिवासी युवकाने चित्रकला महाविद्यालयात कलाशिक्षण देखील घेतलेले आहे. तो सध्या जव्हार येथे राहून सातत्याने कलानिर्मिती करतो. त्याची मुंबई, पुणे, नाशिक तसेच इतरही काही ठिकाणी वारली चित्रकलेची प्रदर्शने झाली आहेत. तो पारंपरिक वारली कलेत नाविन्य आणण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करतो. सप्टेंबर महिन्यात त्याचे नवी दिल्लीत चित्रप्रदर्शन होणार आहे.