समृद्ध महाराष्ट्र घडवण्यासाठी सर्वांच्या साहाय्याने कटीबद्ध होऊया – राज्यपाल रमेश बैस : मोडाळे, शिरसाठे, कुशेगाव येथे विकसित भारत संकल्प यात्रा दौरा मोठ्या उत्साहात संपन्न

इगतपुरीनामा न्यूज –  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार विविध विकास कामे सुरु आहेत. १५ नोव्हेंबरला जनजाती गौरव दिवस असून आदिवासी नागरिकांनी संस्कृती आणि पर्यावरण राखण्यासाठी मोठे योगदान दिले आहे. सन २०४६ पर्यंत विकसित भारत संकल्प पूर्ण होईल. हे करण्यासाठी जनजाती बांधवांमध्ये परिवर्तन होईल. सर्वांपर्यंत शासनाच्या सर्व योजना नक्कीच पोहोचतील. लवकरच २ लाख ५५ ग्रामपंचायती विकसित होतील. राज्य आणि केंद्र सरकारकडून नागरिकांना सशक्त करण्याचे काम सुरु आहे. वीज, पाणी, पोषण, अन्न सुरक्षा आदी कल्याणकारी योजनाचा लाभ देण्याचे लक्ष असून यासाठी ही यात्रा आपल्यापर्यंत आली आहे. पंतप्रधान निर्मित विविध योजननेची माहिती शेवटच्या माणसापर्यंत पोहोचायला पाहिजे. यासाठी लोकसहभाग अत्यंत महत्वाचा आहे. नाशिक हा गोल्डन ट्रांगल असून ह्या भागातील कुपोषणमुक्ती करणे गरजेचे आहे. कुपोषण पीडित नागरिकांसाठी आपण सर्वांनी पुढाकार घेऊन कौशल्य विकास साध्यण्यासाठी आपण कटीबद्ध आहोत. विकसित भारत संकल्प यात्रेद्वारे प्रत्येकाचे कौशल्य निपुणता अत्यावश्यक आहे. समृद्ध महाराष्ट्र बनवण्याचा संकल्प करून आपण पावले उचलून यात्रा यशस्वी करण्यासाठी शुभेच्छा देतो असे प्रतिपादन राज्याचे राज्यपाल महामहीम रमेश बैस यांनी केले. नाशिक जिल्ह्यात प्रभू श्रीराम यांचे पावन वास्तव्य, सप्तश्रुंगी देवी याबद्धल राज्यपालांनी उल्लेख करून नाशिक जिल्ह्याचे विशेष महत्व असल्याचे सांगितले.

विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ म्हणाले की, नाशिक जिल्ह्यात दुसऱ्यांदा राज्यपाल यांचा पदस्पर्श झाल्याने भाग्य उजळले आहे. हा तालुका आदिवासी असून शेतीबहुल भाग आहे. मात्र उत्पादित झालेल्या शेतमालाला बाजारपेठ मिळणे आवश्यक आहे. यासाठी शेतकऱ्यांच्या उत्पादनाला मॉलच्या धर्तीवर संधी द्यायला हवी. वाहून जाणाऱ्या पावसाच्या पाण्यासाठी पाणी साठा व्हायला हवा. यामुळे जास्त जमिनीधारक शेतकऱ्यांना फायदा मिळेल. पर्यटनाच्या माध्यमातून ह्या भागात चांगली संधी आहे. आयुर्वेद विषयावर आदिवासी भागात प्रबोधन आवश्यक असून इगतपुरी तालुक्यात क्रीडा प्रबोधिनी व्हावी. शैक्षणिक गुणवत्ता राखण्यासाठी शासनाने विशेष लक्ष घालण्याचे आदेश द्यावेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पालकमंत्री दादा भुसे म्हणाले की, आदिवासी बांधवांची प्रगती करण्यासाठी संकल्प यात्रा असून भगवान बिरसा मुंडा यांचे स्मरण करून योजनांची परिणामकारक अंमलबजावणी करण्यात येईल. २६ जानेवारी पर्यंत लाखो लाभार्थ्यांना लाभ दिला जाईल. ह्या भागाचे नेते गोरख बोडके यांनी केलेला विकास नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक गावात व्हायला हवा. तालुका आणि शहर पातळीवर बचत गट निर्मित माल विक्री व्यवस्थापन करणार आहोत.

मोडाळे येथे आदिवासी पारंपरिक नृत्याने राज्यपाल महोदयांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. यानंतर विविध विभागाच्या स्टॉलला भेटी देऊन राज्यपालांनी माहिती घेऊन संवाद साधला. राज्यपाल रमेश बैस आणि मान्यवरांनी दीपप्रज्वलन आणि सरस्वतीपूजन केले. राष्ट्रगीत, महाराष्ट्र गीताने मुख्य कार्यक्रमाला प्रारंभ झाला. महिला बचत गट निर्मित वस्तू आणि तिरकामठा देऊन सर्वांचे स्वागत आणि प्रास्ताविक जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले. गायत्री नन्हे यांनी गीत गायन केले. सर्वांना शपथ देण्यात आली. विविध योजनाच्या लाभार्थ्यांना लाभाचे प्रतिनिधिक स्वरूपात वाटप करण्यात आले. बचत गट महिला लाभार्थी मयुरी कातोरे, गुलाब आहेर यांनी मनोगत व्यक्त केले. इगतपुरी तालुक्यातील मोडाळे, शिरसाठे आणि कुशेगाव ह्या तिन्ही गावांमध्ये शासनाच्या विविध योजनांसह सामाजिक क्षेत्रातून भव्य विकास झालेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस गोरख बोडके यांनी ह्या अतिदुर्गम भागाला नवी ओळख दिलेली आहे. त्यांच्या नियोजनानुसार हा परिसर नाशिक जिल्ह्यातील विकसित भाग म्हणून ओळखला जातो. केंद्र सरकारच्या विकसित भारत संकल्प यात्रेनुसार महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांचा दौरा महत्वपूर्ण ठरला आहे. विकासासाठी ह्या भागातील तिन्ही ग्रामपंचायती नेहमीच अग्रेसर असून आजच्या राज्यपाल दौऱ्यामुळे ह्या गावांना नवी दिशा मिळाली आहे.

आमदार हिरामण खोसकर, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, पोलीस महानिरिक्षक बी. जी. शेखर, जिल्हाधिकारी जलज शर्मा व्यासपीठावर होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस गोरख बोडके, माजी आमदार शिवराम झोले, सभापती ज्ञानेश्वर लहाने, सहाय्यक जिल्हाधिकारी जितीन रेहमान, उपविभागीय अधिकारी रवींद्र ठाकरे, उपवनसंरक्षक पंकज गर्ग, सहाय्यक वनसंरक्षक अनिल पवार, वन परीक्षेत्र अधिकारी केतन बिरारीस, तहसीलदार अभिजित बारवकर, गटविकास अधिकारी दीपक पाटील, तालुका कृषी अधिकारी रामदास मडके, सहाय्यक गटविकास अधिकारी अमित भुसावरे, उपअभियंता संजय पाटील, बालविकास प्रकल्पाधिकारी पंडित वाकडे, विस्ताराधिकारी संजय पवार, ज्ञानेश्वर कऱ्हाळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख, मोडाळेच्या सरपंच शिल्पा आहेर, ग्रामपंचायत सदस्य सीताबाई जगताप, मंदा बोडके, गोरख गोऱ्हे, आशा गांगड, वनिता गोऱ्हे, सुरेश लहांगे, गणेश ढोन्नर, ज्ञानेश्वर झोले, काजल बिन्नर, शिरसाठेच्या सरपंच सुनीता दत्तू सदगीर, ग्रामपंचायत सदस्य अनिता चंदगीर, दशरथ ढोन्नर, वर्षा बोडके, कुशेगांवचे सरपंच एकनाथ कातोरे, ग्रामपंचायत सदस्य वंदना सोनवणे, गोटीराम हंबीर, पारू सराई, येसू सराई, कमळाबाई पारधी, ताईबाई आगिवले, बबन खडके, गणेश सराई, चिऊबाई आगिवले यांच्यासह इगतपुरी तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने हजर होते. मुख्य कार्यकारी अधिकारी असिमा मित्तल यांनी आभार मानले. पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली इगतपुरीचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे, वाडीवऱ्हेचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर, घोटीचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

Similar Posts

error: Content is protected !!