
इगतपुरीनामा न्यूज – कारभारी दादा शिवार प्रतिष्ठानच्या वतीने टोमॅटो पिकावर चर्चा सत्र, पीक पाहणी आणि शेतकरी संवाद यात्रा उद्या रविवारी ६ ऑगस्टला होत आहे. सकाळी १० ते १२:३० या वेळेत सोनोशी ता. संगमनेर येथे हा कार्यक्रम होणार आहे. टोमॅटो उत्पादक शेतकरी, कामगार, शास्त्रज्ञ, कृषी विद्यापीठातील प्राध्यापक, कृषी अधिकारी, विक्रेते, नर्सरी, औषध कंपनी, व्यापारी आणि ग्राहक हे सगळे घटक प्रथमच एका बांधावर एकत्र येणार आहेत. संगमनेर आणि सिन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांनी ह्या कार्यक्रमाला अवश्य उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन कारभारी दादा शिवार प्रतिष्ठानचे पदाधिकारी आणि गिते परिवाराने केले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून २५ एकरातील टोमॅटोच्या यशस्वी लागवडीतून भरघोस उत्पन्न मिळणाऱ्या गिते परिवाराची यशोगाथा शेतकऱ्यांना अनुभवायला मिळणार आहे.
२५ एकर क्षेत्रावर लावलेल्या यशस्वी टोमॅटो उत्पादनाचे एकसारख्या अचूक व्यवस्थापनाचे कौशल्यदायी नियोजन पाहण्याची संधी यानिमित्ताने मिळणार आहे. शिवार फेरी, मार्गदर्शन, प्रश्नोत्तरे, स्नेहभोजन असा हा कार्यक्रम राहील. यावेळी अहमदनगरचे जिल्हा कृषी अधीक्षक सुधाकर बोराळे, राहुरी कृषी विद्यापीठातील भाजीपाला रोगशास्त्रज्ञ डॉ. बी. टी. पाटील, भाजीपाला कीटक शास्त्रज्ञ प्रा. एस. ए. पवार, रोगशास्त्रज्ञ प्रा. सी. बी. बाचकर आणि इंन्सेक्टसाईड इंडीयाचे व्यवस्थापक नरेंद्र देशमुख मार्गदर्शन करणार आहेत. फ्रूटवाला बागायतदारचे गणेश नाझिरकर, टोमॅटो एक्सपर्ट अजित कोरडे, उपविभागीय कृषी अधिकारी विलास गायकवाड, तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी, डॉ. जी. जी. पांडेय, विश्व हायटेक नर्सरीचे विरेंद्र थोरात, व्यापारी राजूशेठ अभंग, कृषी सेवा केंद्राचे राम ढेरंगे, कीटक एक्सपर्ट प्रतीक मोरे यांचेही टोमॅटो पिकावरील अनुभव ऐकायला मिळणार आहेत.