इगतपुरीनामा न्यूज, दि. ९ – नवसमाज निर्मिती, आदर्श नागरिक बनण्यासाठी देव, धर्म, राष्ट्र यांच्यासह प्रवचन, कीर्तनातून जागर करणाऱ्या वारकरी संप्रदायाची गरज आहे. हिऱ्याची व काचेची बरोबरी होत नाही. त्याचप्रमाणे पाप पुण्याची कधीही बरोबरी होत नाही. भगवंताचे नामसमरण केल्याने पापाचा नाश होऊन उद्धार होतो. भक्तांसाठी देव परमात्मा आपले सर्वस्व देऊ शकतो असे निरुपण कीर्तनरत्न हभप अमोल महाराज बडाख यांनी केले. जानोरी येथे मठाधिपती माधव बाबा घुले यांच्या आशीर्वादाने हभप अशोक महाराज धांडे यांच्या प्रेरणेने अखंड हरिनाम सप्तहाला प्रारंभ झाला. या सप्ताहात दुसरे पुष्प गुंफताना बडाख महाराज बोलत होते.
संतश्रेष्ठ निळोबाराय महाराज यांच्या अभंगावर त्यांनी परमेश्वराला आवडणाऱ्या भक्तांचे खूप सुंदर वर्णन करून संत चरित्रातील दाखले दिले. चोखोबाराय महाराज, संतश्रेष्ठ कान्होपात्र महाराज यांचे अत्यंत मनाला भिडणारे दृष्टांत हभप अमोल बडाख महाराज यांनी दिले. या सप्ताहात आज जोग महाराज भजनी मठाचे मठाधिपती गुरुवर्य माधव बाबा घुले यांचे कीर्तन होणार आहे. परम पूज्य महंत अचलपूरकर बाबा, हभप अशोक महाराज धांडे, जगदीश महाराज जोशी यांचेही किर्तन होणार आहे. १३ एप्रिलला हभप बाळासाहेब महाराज गतीर यांचे काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाचा समारोप होणार आहे. कार्यक्रमाला गायक किरण महाराज लोहकरे, गोरख गतीर, जानोरीचे पखवाजवादक गणेश भोर आदींची साथ लाभत आहे.