इगतपुरीनामा न्यूज, दि. २३ – वेगवान विकासाने नवी ओळख मिळवलेले असणाऱ्या मोडाळे गावात स्वतंत्र पोस्ट कार्यालय कार्यान्वित झाले आहे. आजपासून मोडाळे, शिरसाठे, कुशेगाव यांचे पोस्ट ऑफिस मोडाळे झाले असून गावासाठी ४२२४०२ हा पिनकोड देण्यात आला आहे. मोडाळे गावकऱ्यांना शैक्षणिक पदव्या आणि उच्च शिक्षणामुळे युवकांना नोकऱ्यांच्या संधी पोस्टाच्या सेवेद्वारे मिळण्यासाठी ब्रिटिश काळातील सांजेगाव पोस्टाच्या संपर्कात राहावे लागत होते. यापुढे नागरिकांचे दुखणे मिटले असून पोस्टाच्या विविध योजनांचा लाभ लोकांना जागेवर मिळणार आहे. जिल्हा नियोजन समितीचे सदस्य गोरख बोडके यांनी स्वतंत्र पोस्टासाठी विशेष पाठपुरावा केला होता. इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर यांनीही महत्वपूर्ण योगदान दिले आहे. नाशिक विभागाचे प्रवर डाक अधीक्षक मोहन अहिरराव यांनी आज गोरख बोडके यांना पोस्ट सुरु होत असल्याचे पत्र सुपूर्द केले. पोस्टासाठी स्वतंत्र दिमाखदार इमारत सुद्धा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सांजेगाव पोस्ट कार्यालयाशी आता ह्या तिन्ही गावांचा संबंध संपुष्टात आला आहे. अतिदुर्गम गाव, सभोवताली डोंगर दऱ्या, साधनांचा अभाव आणि जगाची कोणतीही खबर नसलेले गाव म्हणून इगतपुरी तालुक्यातील मोडाळे गाव प्रसिद्ध होते. मात्र गेल्या काही वर्षात जिल्हा नियोजन समिती सदस्य गोरख बोडके यांनी ग्रामस्थांसह ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन गावाचा चेहरामोहरा बदलून टाकला. स्वतंत्र पोस्ट कार्यालयामुळे ग्रामस्थांनी आनंद व्यक्त करून जिल्हा नियोजन समितीचे सदस्य गोरख बोडके यांचे आभार मानले आहेत.
Similar Posts
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group