इगतपुरीनामा न्यूज, दि. 24
इगतपुरी तालुक्यातील प्राधान्य कुटूंब व अंत्योदय अन्न योजनेतील पात्र कुटुंबांना दिवाळीनिमित्त वाटप करण्यात येणाऱ्या “आनंदाचा शिधा” संचाचे वितरण आजपासून ऑफलाईन पध्दतीने सुरु झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या निर्णयामुळे फक्त १०० रुपयात १ किलो साखर, १ किलो रवा, १ किलो चणाडाळ व १ लिटर पामतेल या चार वस्तू असला “आनंदाचा शिधा” वाटप प्रत्येक स्वस्त धान्य दुकानात वाटप करण्यात येत आहे. आनंदाचा शिधा ह्या संचाचे वाटप आता ऑफलाईन पद्धतीने करण्यात येत आहे. इगतपुरीचे तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी केलेल्या सूक्ष्म नियोजनानुसार प्रत्येक लाभार्थी कुटुंबात हा शिधासंच पोहोचणार आहे. दर्जात्मक शिधा असल्याने लाभार्थ्यांनी मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत. इगतपुरीचे तहसीलदार परमेश्वर कासुळे यांचेही आभार मानले जात आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्णयानुसार अन्न वं नागरी पुरवठा मंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिवाळीच्या निमित्ताने शिधा संच प्राधान्याने पात्र शिधापत्रिकाधारकांपर्यंत पोहचविण्याच्या सूचना दिल्या आहेत. लाभार्थी शिधापत्रिकाधारकांनी या ऑफलाईन वितरणाचा लाभ आपापल्या जवळच्या रेशनिंग दुकानात जाऊन घ्यावा असे आवाहनही करण्यात आले आहे. ऑफलाईन पध्दतीने केलेल्या शिधा वाटपाची माहिती सेल रजिस्टरमध्ये प्रत्येक दुकानदाराकडून नोंदवली जात आहे. नोंद घेतांना लाभधारकाचे नाव, RCचे चार अंक, मोबाईल, दिलेल्या शिधा वस्तूंचा तपशील, १०० रुपये, लाभधारकाची सही ह्या बाबी नमूद केल्या जात आहे अशी माहिती बेलगाव कुऱ्हे येथील स्वस्त धान्य दुकानदार संतोष गुळवे यांनी दिली. ऑफलाईन पद्धत केवळ दिवाळी भेट शिधाजिन्नस वाटपासाठी लागू आहे. NFSA आणि PMGKAY योजनेसाठी ऑनलाईन पद्धतच वापरण्यात यावी. दिवाळी भेट वाटपासाठी Offline पद्धत अस्तित्वात असली तरी गोदामात येणारी जिन्नस आवक तसेच रास्त भाव दुकानात पाठवण्यात येणारे जिन्नस यांची नोंद ऑनलाईन पद्धतीनेच ठेवणे आवश्यक आहे. त्याबाबत दक्षता घेण्याच्या व कारवाई करण्याचे निर्देश आहेत असे तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी सांगितले.