इगतपुरीनामा न्यूज, दि. 21
झपाट्याने बदलत असलेल्या नव्या जगाचा, नव्या समाजाचा रोख नेहमीच स्वतःकडे झुकतो आहे. अशा स्थितीत गरीब श्रीमंतीची दरीही रुंदावत चालली आहे. गरिबीचे चटके सोसलेले पण श्रीमंत झालेले अनेक लोक गरिबांना विसरले आहेत. मनमोकळेपणाने गरिबांच्या जीवनाचं वास्तव समजून घ्यायला कोणी तयार नाही. माणुसकी आणि माणसातला परमेश्वर जाणून घेण्यास उत्सुक असणाऱ्यांची वानवा आहे. अशा भयानक स्थितीत डोळे असूनही आंधळ्याचे सोंग घेतलेल्या लोकांना इगतपुरीच्या जनसेवा प्रतिष्ठानने आदर्श दाखवला आहे. त्यानुसार दीपावलीच्या पार्श्वभूमीवर अतिदुर्गम आदिवासी भागातील वंचित, गरजू, निराधार बालकांना कपडे आणि दिवाळीचा फराळ वाटप करण्यात आले. जनसेवा हीच ईश्वरसेवा ह्या ब्रीदवाक्यानुसार प्रतिष्ठानचे पदाधिकारी नेहमीच विविध उपक्रम राबवत असतात. अनेक वर्षांपासून गोरगरिबांसाठी सुरू असलेले सामाजिक उत्तरदायित्व पार पाडण्यासाठी जनसेवा प्रतिष्टान सातत्याने अग्रेसर आहे. ज्यांच्या घरात ” प्रकाशोत्सव ” नाही अशा वंचितांच्या जीवनातील अंधार दूर करण्यासाठी जनसेवा प्रतिष्ठानने वंचितांना कपडे, फराळ वाटपाचे नियोजन केले. मार्गदर्शक म्हणून इगतपुरीचे तहसीलदार परमेश्वर कासुळे तसेच सुखलालजी ( पिचा घोटी ), श्री माहेश्वरी समाज इगतपुरी, जनसेवा प्रतिष्ठानचे सर्व सदस्य यांनी सहाय्य केले.
इगतपुरीचे सहायक पोलीस निरीक्षक सोपान राखुंडे, लोहमार्ग पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन बनकर, व्यापारी असोसिएशनचे कन्हैयालाल बजाज, गौतम दर्डा, शिक्षक रामानंद बर्वे, ॲड. विजय कर्नावट, रमेशसिंग परदेशी, नगरसेवक योगेश चांडक, चारूलता ठाकुर, अंजुताई पराड, गुप्ता मॅडम, महिंद्रा कंपनीचे अधिकारी जयंत इंगळे, हरीष चौबे, श्रमजीवी संघटनेच्या निता गावंडा, पत्रकार भास्कर सोनवणे, वाल्मीक गवांदे, किशोर देहाडे,सतीष पुरोहित आदी मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. गरिबांच्या जीवनातला थोडातरी अंधार दूर होऊन प्रकाशाची किरणे दिसण्यासाठी जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष किरण फलटणकर, दिपक राठी, शांतीलाल चांडक, गजानन गोफणे, प्रकाश नावंदर, अस्लम शेख, शैलेश शर्मा,आनंद कर्नावट, कपील चांडक, ओमप्रकाश राठी, समर्थ गोफणे यांनी प्रयत्न केले.