लेखक : श्री. बाप्पा गतीर, विशेष शिक्षक
मुंढेगावकर, ता. इगतपुरी
जि. नाशिक मोबा. 8805795532
सवंगड्यांसोबत ओहळात उंचावरून सूर मारून पोहताना पाण्यातील दगडांचा अंदाज चुकला. त्यामुळे अचानक आलेल्या अपंगत्वामुळे शारीरिक कष्टाची कामे करून कुटुंबाचा गाडा हाकता येणार नव्हता. यामुळे टेलरिंग व्यवसायाकडे माझ्या वडिलांचा कल गेला. प्राप्त कौशल्याने पंचक्रोशीतील लहानथोर मंडळी चोळी, कोपरी, लेहंगा, नेहरू अशा अनंत प्रकारच्या कपड्यांच्या शिलाईने वडिलांना नावारूपास आणले. दोन-तीन महिन्यांनी दिलेल्या कपड्यांचा शिलाईसाठी नंबर लागे. गावात पुष्कळ टेलर असूनही लोक तिकडे फिरकतही नसत. कपडे उधारीत घेऊन गेलेले व्यक्ती कपडे फाटल्याशिवाय नवीन कपडे शिवण्यासाठी येत त्यावेळी उधारी मिळत असे. करावी लागणारी मेहनत व उधारीमुळे आपल्या मुलांनी या व्यवसायात येऊ नये, तसेच या श्रमातून मिळणारा मोबदला अल्प असल्यामुळे मुलांनी या व्यवसायाकडे येऊ नये असा त्यांचा मानसिक समज. मुलांनी विनाकारण फिरण्यापेक्षा बकऱ्या सांभाळाव्यात असा विचार करून बकऱ्यांचा जोडधंदा सुरू झाला. एक दोन तीन अशी बकऱ्यांची संख्या वाढत गेली. मात्र घरातील जागेमुळे 10 च बकऱ्या ठेवाव्यात असा विचार करून बाकीच्या विकून टाकल्या. घर तसं अगदी लहान, एक खणच. त्यात कुटुंबाचा गोतावळा, शिलाई मशीन, स्वयंपाकघर सर्व काही तिथच. शालेय शिक्षण घेता घेता बकऱ्या सांभाळणं ही नित्याची बाब झाली. हातात पुस्तक घेतलं असले तरी लक्ष मात्र बकऱ्याकडे असे.
बकरी म्हणजे माणसाचं मनच क्षणार्धात माणसाचं मन कुठे जाईल याचा भरवसा नसतो. तसंच या बकऱ्यांचं. बकरी एका ठिकाणी थांबून एक घास खात नाही. सतत भटकत असते. एका ठिकाणी थांबून झाड पाला खाणारी तिची जात नाही. दिवसभरात ती कितीतरी ठिकाणी एकेक घास खात भटकत असते. हिरवीगार झाडं किंवा शेतातील शेतातील पीक दिसली म्हणजे खूप फजिती होई.
गंमत सांगायच म्हणजे आमच्या बकऱ्या म्हणजे बकऱ्या नव्हत्याच. त्यांचं नामकरण करून घेतल होत. मनी, गंगु, तार, हिरा, लारा, गोटया, पिंट्या, राजा, लाल्या अशी कितीतरी नावे ठेवली जात.
माणसानं माणसाला कितीही वळण लावायचं ठरवलं तरी आपला गुणधर्म सोडत नाही. पोपटपंची करणारी माणसे असतात. सांगतात एक करतात मात्र भलतेच. असा माणूस आपण पहात आहोत. मात्र मुक्या प्राण्याला दिलेली शिकवण सवयींशी ते एकनिष्ठ असतात. असा माझा आत्मविश्वास आहे। अपुऱ्या जागेमुळे घरात ओल होऊ नये म्हणून सकाळ संध्याकाळी त्यांना घराबाहेर काढत असत. घराबाहेर शी सु केलं म्हणजे त्यांना घरात घेतलं जाई. या सवयीने बकरीने घरात लघवी केली असे मला कधीही दिसलं नाही. आठवतही नाही.
या वेळेत कमी जास्तपणा झाला म्हणजे मात्र बकऱ्यांचे आरडाओरड सुरू होई. सगळ्यांना बसायला बाडदान लागे. अन्यथा त्या बसणार नाहीत अश्या कितीतरी आठवणी मनात घर करून आहेत.
त्या कुठेही व कोणाच्याही जागेवर अतिक्रमण करत नसत. सगळ्या बकऱ्यांचा आवडते पेय म्हणजे चहा. चहा वेळी घरात कपबशांचा आवाज झाला म्हणजे गोट्या, पिंट्या दावन ( दोरखंड ) तोडून घरात येई. एखादा पाहुणा आला म्हणजे सगळ्यांची फजिती व्हायची. मनीला, गंगूला दूध कमी असल्यामुळे त्यांना चहा पाजला व त्याची त्यांना सवयच झाली.
कधीकधी फार अवघड प्रसंग निर्माण होई. सगळेच प्राणी माणसांसारखे बुद्धिमान असतात. प्रत्येकाचा बौद्धिक स्तर वेगळा असतो. तसा गंगूच्या बाबतीत होता. गंगु इतरांच्या मानाने फारच हुशार होती. सगळ्या बकऱ्यांची जणू ती मंत्रीन होती. कोण असेल तिच्यात काय कौशल्ये गुण असेल तिचं तिलाच माहीत. दिलेली सूचना तिला कळत होती. त्याची अंमलबजावणी सुद्धा ती नीट करत. माणसातलं माणूसपण तिच्यात पाहायला मिळे. गंगु कुठेही असोत कितीही लांब असलो आवाज दिला की गंगु येणार, जा म्हटलं की जाणार, अशा खूप काही खुबी तिच्यात होत्या.
एकदा मात्र गंगुमुळे जीवावर बेतलं. उन्हाळ्याच्या दिवसात रणरणत्या उन्हात बकऱ्या चारता चारता दिसेनासे झाल्या. डोंगराळ भाग असल्यामुळे जवळ असूनही नसल्यागत बकऱ्या होत्या. गंगूला, ताराला जोरात आरोळ्या मारण्यास सुरुवात केली. पण गंगु काही येईना. थोड्याच वेळात एका शेतातील झोपडीतून हातात दांडके घेऊन माझ्या दिशेने एक व्यक्ती पळतच आली. अचानक काय पळापळ झाली काहीच समजेना, त्यांच्या येण्याने आपल्याला मारणार आहेत असं समजलं. आणि मीही पळायला लागलो. मीही पळालो परंतु काही वेळेतच पकडलो सुद्धा गेलो. मार खाल्ला पण त्यांनी मला का मारलं हेच समजू शकलं नाही ? रागाच्या आवेशात येऊन त्या माणसाने आमच्या सुनेला का हाक मारली? कशाला बोलवत होता? असा बोलू लागला. आता मात्र मला सगळं समजलं होतं. पण त्यांनाही सांगू कसं काही केल्याने त्यांना ते सांगावं लागेल असं समजून मी त्यांना माझ्या बकरीचा नाव गंगू असल्याचे सांगितले. पण ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. शेवटी हाक मारली गंगु सगळा तांडा ( सर्व बकऱ्या) घेऊन माझ्याजवळ आली. आता मात्र त्यांची खात्री पटली. गैरसमज निघून गेला. हा प्रसंग आठवला की, आजही अगदी हसायला येते. गंगुची जनण्याची वेळ झाली, पायात काटा रूतला म्हणजे दोन्ही पायांच्या खुराने लाडात येऊन तापरण्याचा प्रयत्न करी. तिच्या मूक संवादाने अंतरीची खुण भावना कळून येई.
जन्माला आलेल्या प्रत्येक बकरीच्या पिलाचं आपल्या बालकाप्रमाणे लालन पालन करत असू .लहानाचे मोठे झाले की नाईलाजाने त्यांना विकण्याची वेळ येई. तेव्हा मात्र जीव कासावीस होई. फारच वाईट वाटे. घोटीच्या बाजारात बोकड विकल्यानंतर खाटकाच्या दावणीला बोकड बांधून आईने दिलेली त्याला शेवटची भाकरी भरून डोळे पाण्याने भरून येत. जसे जसे आपण त्याच्यापासून दूर जावं तसं त्याचा ओरडण्याचा आवेग वाढत असे. जणू काही तो मला सोडून जाऊ नका असेच सांगत असेल मला विकु नका ,मला तुमच्यासोबत घ्या. असं काही तो सांगत असे मन दाटून येतय खूप वाईट वाटे पण नाईलाजास्तव …!
माणसावर चांगले संस्कार व्हावेत म्हणून शाळा, विद्यालय निर्माण झाली. पण अबोल मुक्या प्राण्यांना प्रेमाने गोंजारून त्यांच्यात नवचैतन्य निर्माण होते. ते कुठल्या विद्यापीठात शिकले हेच कळत नाही. मालकावर असणारी निष्ठा व प्रामाणिकपणा आढळतो. पशुतुल्य जीवन जगू नये अशी म्हण आहे. पण पशूंमध्येही वरील गुण आपल्याला खूप काही समजून घेण्यासारखे आहेत .
2 Comments