इगतपुरीनामा न्यूज (शैलेश पुरोहित) दि. २ : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर इगतपुरी प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून कमी लक्षणे असणाऱ्या आणि अजिबात लक्षणे नसणाऱ्या बाधितांना घरीच विलगीकरणात राहून औषधोपचार घेण्यास सांगितले आहे. मात्र हेच विलगीकरणात असलेले बाधित शहरातील ‘सुपर स्प्रेडर’ असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. विलगिकरणात असतांनाही या व्यक्ती घराबाहेर पडत असून सर्रास सामान्य जनतेमध्ये मिसळतांना दिसत आहेत. हे सुपर स्प्रेडर मुकाट्याने घरी न राहता बाहेर हिंडत असल्याने आणि सातत्याने इतर नागरिकांच्या संपर्कात असल्याने यांच्यामुळे कोरोनाचा संसर्ग पसरत असल्याची भयावह स्थिती सध्या इगतपुरीकर अनुभवत आहेत.
या ‘सुपर’ मंडळीने विलगिकरणात राहणे अपेक्षित असतांना हे रुग्ण घरी न राहता बाजारपेठ, वाइन शॉप, हॉटेल, परमिट रूम मध्ये सर्रास वावरताना दिसत आहेत. त्याचबरोबर ग्रामीण रुग्णालय येथे उपचार घेत असलेल्या कोरोना बधितांचे नातेवाईक आणि इतरही कोरोना टेस्ट करण्यासाठी येणारे सामान्य नागरिक विना मास्क वावरत असतांना दिसून येत असून काही महाभाग तर चक्क किंवा नाकाखाली आणि दाढीला मास्क लावून फिरतांना दिसत आहेत. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी त्यांना मास्क लावण्यास सांगितल्यावर मात्र हे महाभाग मास्क तर लावत नाहीतच वरून कर्मचाऱ्यांशी उर्मटपणे वाद घालतात. सुदैवाने आपल्याकडे आरोग्य यंत्रणा अजून कोरोनाच्या तडाख्यात सापडलेली नाही, त्यामुळे रुग्णांकडे अधिक चांगल्या पद्धतीने लक्ष देण्यासाठी उपलब्ध मनुष्यबळाचा पुरेपूर वापर करता येतो. मात्र या बेजबाबदार नागरिकांमुळे रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचारीच जर बाधित झाले तर आरोग्यसेवेचे तीन तेरा वाजल्याशिवाय राहणार नाहीत! ज्यांच्यावर आपल्याला आरोग्य सेवा देण्याची जबाबदारी आहे तेच जर बाधित झाले तर आरोग्यसेवा कोलमडून पडल्याशिवाय राहणार नाही.
नगरपरिषद प्रशासनाबद्दल तर न बोललेलेच बरे! बाजारपेठेत नागरिक सर्रास विना मास्क वावरत आहेत, मात्र नगरपरिषद कुठेही जनजागृती करताना अथवा विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करतांना किंवा दंड आकारतांना दिसत नाही! जणू काही ही त्यांची जबाबदारी नाहीच!
दुसरा मुद्दा दुकान आणि आस्थापनांचा! हा तर फारच वेगळा विषय! इगतपुरी शहरात कित्येक दुकानं प्रशासनाने ठरवून दिलेल्या वेळेनंतरही सर्रास चालू दिसून येतात. कधी शटर खाली करून, कधी अर्धे शटर चालू ठेवून तर कधी मागच्या दाराने! सारं काही उघड गुपित झालंय आता हे! अशा निर्धारीत वेळेपेक्षा जास्त वेळ चुपके चुपके सुरू असणाऱ्या दुकान आणि आस्थापनांवर कारवाई करण्याची सुद्धा इच्छाशक्ती दुर्दैवाने प्रशासनाकडे दिसत नाही! रात्रीच्या जमावबंदी आदेशालाही नागरिक केराची टोपली दाखवत आहेत. पोलिस दिसले की नागरिक कारवाई टाळण्यासाठी तेवढ्यापुरता मास्क लावतात आणि दुकानदारही तेवढ्या वेळेपुरते दुकान बंद करतात. घोळक्यातले महाभागही वेगवेगळे असल्याचे भासवततात आणि पटकन पांगतात. मात्र पोलीस निघून गेले की पुन्हा जैसे थे!
नियमाप्रमाणे ज्या इमारतीत बाधित रुग्ण आढळून आला आहे ती इमारत आणि परिसर प्रतिबंधित क्षेत्र घोषित करून तेथे बोर्ड लावणे गरजेचे आहे, मात्र नगरपालिका प्रशासन बाधित रुग्णाच्या घराच्या दारावर बोर्ड लावून निघून जाण्यातच धन्यता मानतांना दिसत आहे. आणि यामुळे बाधित रुग्णांना कुणाचाही धाक राहिलेला नसून ते सर्रासपणे बाहेर फिरतांना दिसत आहेत. ही प्रचंड धोकादायक बाब असून जर वेळीच या सुपर स्प्रेडर्सचा बंदोबस्त केला नाही तर याची खूप मोठी किंमत इगतपुरी करांना चुकवावी लागेल, एवढं मात्र नक्की!