प्रभाकर आवारी : इगतपुरीनामा न्यूज, दि. ९
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत कोविड संदर्भात बोलतांना महाराष्ट्रावर चिखलफेक करीत चुकीचे आरोप केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रावर चिखलफेक केली. याबाबत पंतप्रधानांनी याबाबत माफी मागावी अन्यथा भाजपा कार्यालयासमोर आंदोलन करू असे निवेदन इगतपुरी तालुका काँग्रेसच्यावतीने देण्यात आले. काँग्रेस नेते ॲड. संदीप गुळवे, तालुकाध्यक्ष रमेश जाधव, माजी सभापती गोपाळ लहांगे यांच्या नेतृत्वाखाली इगतपुरीचे तहसीलदार परमेश्वर कासुळे यांना निवेदन देऊन निषेध व्यक्त करण्यात आला.
कोरोना काळात डोनाल्ड ट्रम्प यांना भारतात आणुन कार्यक्रम केले. यामुळेच कोरोनाचा अधिक फैलाव झाला असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच कोरोनाचे स्प्रेडर असल्याचे निवेदनात म्हटले आहे. पंतप्रधान ज्या परप्रांतीय मजुरांवर कोरोनाच्या फैलावाचा आरोप करीत आहेत ते मजूर कोरोना वाँरीयर असुन पंतप्रधानांनी महाराष्ट्राची जाहीर माफी मागावी. अन्यथा भाजपच्या कार्यालयासमोर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आंदोलन करण्याचा इशारा यावेळी निवेदनात देण्यात आला. यावेळी काँग्रेस नेते ॲड. संदीप गुळवे, काँग्रेसचे इगतपुरी तालुकाध्यक्ष रमेश जाधव, माजी सभापती गोपाळ लहांगे, संपतराव काळे, कार्याध्यक्ष अरुण गायकर, शेतकरी नेते पांडुरंग शिंदे, कावनई सहकारी संस्थेचे अध्यक्ष शिवाजी शिरसाठ, जगनराव जगताप, संदीप दोंदे आदी उपस्थित होते.