प्रभाकर आवारी : इगतपुरीनामा न्यूज, दि. २२
मौजमस्ती करून डिजेच्या तालावर थिरकत वाढदिवस साजरा करण्याचे जणु एक फॅडच तयार झाले आहे. मात्र आजच्या तरुण पिढीला एक आदर्शवत उपक्रम राबवुन वाढदिवस साजरा केलाय इगतपुरी तालुक्यातील गोंदेदुमाला गावच्या तरुण डॉक्टर रुपेश हरिश्चंद्र नाठे यांनी. त्यांच्या या आगळ्या वेगळ्या उपक्रमाने ३०० कुटुंबियांना दवाखान्याच्या इलाज करण्यासाठी ३० टक्के सवलत मिळणार आहे. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. वाढदिवसाच्या दिवशी कुठल्या ही प्रकारचा पार्टीवर पैसे खर्च न करता सामाजिक कार्यक्रमातुन आपला वाढदिवस साजरा करायचा या संकल्पनेने हिंदवी स्वराज्य ग्रुपचे संस्थापक डॉ. रुपेश हरिश्चंद्र नाठे गेल्या ८ वर्षा पासुन आपला वाढदिवस सामाजिक कार्य करुन साजरा करत आहेत. त्याला कुठलाही खंड न पडु देता यावर्षी त्यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त ३००० कुटुंबांना आरोग्य कार्ड वाटप करून एक आदर्शवत उपक्रम राबविला आहे.
गोंदे दुमालाचे माजी सदस्य तथा घोटी खरेदी-विक्री संघाचे उपसभापती, नाशिक येथील बॉश कंपनीचे युनियनचे लिडर हरिश्चंद्र नाठे यांचे चिरंजीव डॉक्टर रुपेश नाठे यांचा वाढदिवस त्यांनी ३ हजार जणांना आरोग्य कार्ड वाटप करून आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा केला. हे आरोग्य कार्ड नाशिक मधील नामांकित हॉस्पिटल व मेडिकलमध्ये रुग्णांना खर्चाच्या ३० टक्के सवलत मिळून देणार आहे. गरजु रुग्णांना याची खुप मोठी मदत होणार आहे. आरोग्यकार्डच्या मदतीने सर्व प्रकारचे औषधे, रक्त तपासणी, सोनोग्राफी, एक्स रे, पॅथॉलॉजी लॅब, रुग्णालय इत्यादी गोष्टींवर नागरिकांना सवलत मिळणार आहे.
याआधी देखील रुपेश नाठे यांनी वाढदिवसानिमित्ताने वेगवेगळे उपक्रम राबवले आहेत. या इंग्रजी नवीन वर्षाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या रुद्राभिषेक व पट्टा किल्ला ते गोंदे दुमाला गावापर्यंत पालखी सोहळ्याने सुरू केली होती. इगतपुरी येथील जोग महाराज भजनी मठाचे मठाधिपती ह.भ.प. माधव महाराज घुले यांच्याहस्ते आरोग्यकार्ड वाटप करून एक वेगळा आदर्श निर्माण केला. यावेळी घोटी बाजार समितीचे संचालक तुकाराम वारघडे, शिवव्याख्याते सुनिल भोर, छावा संघटनेचे तालुकाध्यक्ष गोकुळ धोंगडे, युवासेना त्र्यंबकेश्वर तालुकाप्रमुख संदीप चव्हाण, त्र्यंबकेश्वर मंदिर ट्रस्टचे विश्वस्त भूषण अडसरे, ऋषिकेश मुधळे, संजय कश्यप, अजय कश्यप, सोनू गंगापूत्र आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.