इगतपुरीनामा न्यूज दि. ३ : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंचलेखैरे यांच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरी करण्यात आली. सर्व सावित्रीच्या लेकी घेऊन त्रिंगलवाडी किल्ल्यावर जाऊन सावित्रीबाईंच्या ओव्या गाऊन पुष्पहार अर्पण मोठ्या अभिमानाने साजरी करण्यात आली.
आम्ही काही कमी नाही या उक्तीप्रमाणे आदिवासी दुर्गम भागातील सावित्रीच्या लेकी, विद्यार्थी व शिक्षक यांनी कडेकपारी, अवघड वाटा, पार करून त्रिंगलवाडी किल्ला सर केला. यावेळी सर्व शिक्षक शिक्षिका मोठ्या उत्स्फूर्तेने सहभागी सहभागी झाले. किल्ल्यावर चढण्याचा आनंद, आत्मविश्वास, चिकाटी, जिद्द या गुणांची प्रत्यक्ष सावित्रीच्या लेकींना प्रचिती आली.
भव्य दरवाजा, अवघड वाटा, हनुमानाचे मंदिर, भवानी मातेचे मंदिर, पाण्याचे टाके, डोंगरातील गडद हे सर्व वैभव पाहून भूतकाळातील इतिहास जागृत झाला. सावित्रीच्या लेकींनी हर हर महादेव, जय भवानी, जय शिवाजी, जय सावित्री अशा घोषणा दिल्या मनसोक्त न्याहारी करून टाक्यातले थंड पाणी पिऊन एक वेगळं वनभोजन साजरे झाले. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याचं औचित्य साधून सावित्रीबाईंची जयंती किल्ल्यावर साजरी करणारी चींचलेखैरे ही पहिलीच शाळा आहे. मुख्याध्यापक निवृत्ती तळपाडे, नामदेव धादवड, भाग्यश्री जोशी, प्रशांत बांबळे, हौशीराम भगत, योगेश गवारी यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले होते.