इगतपुरीनामा न्यूज, दि. २७
इगतपुरी तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णसंख्या कमी होत आहे असे वाटत असतांनाच आकड्यांमध्ये मात्र पुन्हा वाढ होतांना दिसत आहे. तालुक्यासाठी पुन्हा धोक्याची घंटा वाजू पाहत आहे. आज आलेल्या अहवालानुसार तालुक्यात १३ नवीन रुग्णांची भर पडली असून फक्त ५ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. गेले काही दिवस कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांचे आकडे हे नवीन बाधितांपेक्षा जास्त येत आहेत, त्यामुळे दिलासादायक वातावरण निर्माण होत असतांनाच दोन दिवसांपासून रुग्णसंख्येत किंचित का असेना पण वाढ होतांना दिसत आहे. तालुक्यासाठी ही बाब निश्चितच गंभीर असून किंचित होणारी वाढ कधीही मोठे आकडे दाखवायला सुरुवात करेल ही शक्यता निर्माण झाली असून सर्वांनी अलर्ट राहणे गरजेचे आहे.
तालुक्यात आज अखेर एकूण ९२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तीन अंकी संख्येवरून महत्प्रयासाने रुग्णसंख्या दोन आकडी संख्येवर आली आहे, त्यामुळे त्यात वाढ होणे ही धोक्याची घंटा ठरू नये ही जबाबदारी तालुक्यातील सर्व घटकांची आहे, विनाकारण घराबाहेर पडू नये, गरज भासल्यास सर्व काळजी घेऊनच घराबाहेर पडावे, कोरोना नियमावलीचे पालन करावे, मास्कचा वापर करण्यात हयगय न करता सगळ्यांनी योग्य पद्धतीने मास्कचा वापर करावा असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख यांनी केले आहे.