‘एसआयआर’च्या नावाखाली मतदानाचा अधिकार हिरावण्याचा डाव – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ ‘वोट चोर, गद्दी छोड’चा कुरुंगवाडीतून शंखनाद ; तुफान गर्दीत “चौपाल” सभा संपन्न 

भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – “कुरुंगवाडीसारख्या दुर्गम आदिवासी गावात एकूण ७५० मतदार आहेत. परंतु दुर्दैवाने यातील तब्बल १५० मतदारांच्या मतदानावर प्रशासनाने गदा आणली आहे. हे नागरिक याच गावचे मूळ रहिवासी आहेत, त्यांचा जन्म याच मातीत झाला आहे; तरीही ‘एसआयआर’च्या माध्यमातून त्यांची नावे वगळण्यात आली आहेत. गावातील २० टक्के मतदान परस्पर कमी करणे, हा एसआयआरचा खरा आणि घातक चेहरा आहे. या शब्दांत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारवर आणि प्रशासनावर अतिशय आक्रमक शब्दांत हल्लाबोल केला. श्री. सपकाळ पुढे म्हणाले की, “या अन्यायाविरोधात ‘वोट चोर, गद्दी छोड’ आणि ‘संविधान बचाव’ अभियानाच्या माध्यमातून कुरुंगवाडी येथे ग्रामसभा पार पडली आहे. या अभियानात पूर्ण ताकदीने सहभागी होण्याचा एकमुखी ठराव येथील ग्रामस्थांनी केला असून, संपूर्ण गाव काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आहे. एसआयआर कार्यक्रम किती चुकीचा आहे आणि आदिवासींचा मतदानाचा हक्क कसा हिरावून घेतला जात आहे, हे या कुरुंगवाडीने संपूर्ण राज्यासमोर उघड केले आहे.” इगतपुरी तालुक्यातील अतिदुर्गम कुरुंगवाडी येथे काँग्रेसच्या वतीने आयोजित चौपाल सभेला आदिवासी बांधवांचा अभूतपूर्व आणि तुफान प्रतिसाद मिळाला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, महाराष्ट्र प्रभारी सिरिवेला प्रसाद आणि सहप्रभारी बी. एम. संदीप यांच्या प्रमुख उपस्थितीत ही सभा पार पडली. कार्यक्रमाचे प्रभावी संयोजन काँग्रेस नेते लकीभाऊ जाधव, तालुकाध्यक्ष रामदास धांडे, जिल्हा सरचिटणीस आकाश पारख यांनी केले होते. सरपंच गोपाळ सावंत, पिंटू सावंत, शंकर सावंत  यांनी ग्रामस्थांच्या भावना प्रभावीपणे मांडल्या.

हर्षवर्धन सपकाळ घणाघात करतांना पुढे म्हणाले की, देशातील नागरिकांचे हक्क आणि स्वातंत्र्य हिरावून घेऊन त्यांना पुन्हा एकदा गुलाम बनवण्याचे मोठे षड्यंत्र रचले जात आहे. देशाची संपत्ती आणि जमिनी उद्योगपतींच्या घशात घातल्या जात आहेत. सर्वसामान्यांच्या, शेतकऱ्यांच्या जमिनी काढून घेऊन तिथे बेगडा विकास उभा केल्या जात आहे. मात्र, या विकासात स्थानिकांना केवळ चौकीदारी करण्याचेच काम उरणार आहे का? असा रोखठोक सवाल त्यांनी उपस्थित केला. आपल्या अधिकारांवर गदा आणली जात असून, नागरिकांचे अधिकार काढून घेऊन त्यांना पुन्हा गुलाम बनवण्याची प्रक्रिया सुरू आहे. पूर्वी इंग्रजांची गुलामी होती, आता दिल्लीत बसलेले ‘रंगा-बिल्ला’ देशात आर्थिक आणि राजकीय गुलामी लादत आहे. भारतीय संविधान, देशाची संस्कृती आणि काँग्रेस ज्यांना ‘आदिवासी’ मानते, त्यांना भाजप व संघ ‘वनवासी’ म्हणून हिणवत आहे. आदिवासींची मूलनिवासी ओळख पुसून टाकण्याचा आणि त्यांची संस्कृती नष्ट करण्याचा प्रयत्न सुरू आहे. “जर आपण आजही हातावर हात ठेवून गप्प बसलो, तर हे सत्ताधारी आपल्या पायातील घुंगरूही विकून टाकतील. त्यामुळे आपल्या अधिकारांचे, संविधानाचे, मतांच्या रक्षणासाठी सर्वांनी एकत्र येऊन लढण्याची गरज आहे.” प्रदेश नेते राजाराम पानगव्हाणे, जिल्हाध्यक्ष भारत टाकेकर आदी उपस्थित होते. सर्व नेत्यांनी कुरुंगवाडीच्या गावदेवीचे भाविकतेने दर्शन घेतले. आदिवासी महिलांनी पारंपरिक पद्धतीने औक्षण केले. आदिवासी बांधवांनी नयनरम्य नृत्य सादर करत सर्व नेत्यांचे ढोल-ताशांच्या गजरात जंगी स्वागत केले. अभूतपूर्व तुफान गर्दी झालेल्या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

error: Content is protected !!