३० हजारांची लाच मागणाऱ्या घोटीच्या पोलीस हवालदारावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

इगतपुरीनामा न्यूज – घोटी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात तपासात मदत करण्याच्या मोबदल्यात ३० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या पोलीस हवालदारावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने यशस्वी कारवाई केली आहे. या प्रकरणी संबंधित पोलीस हवालदाराला ताब्यात घेण्यात आले असून, घोटी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ च्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. नाशिक येथील एका ३४ वर्षीय शेतकऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारदाराच्या नातेवाईकांसह एकूण १० जणांविरुद्ध घोटी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ मधील विविध कलमांनुसार गुन्हा रजिस्टर क्रमांक २७१/२६ अन्वये गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यातील तक्रारदाराचे नातेवाईक असलेल्या सहा आरोपींना तपासात मदत करण्याच्या मोबदल्यात संबंधित पोलीस हवालदाराने प्रत्येकी पाच हजार रुपयांप्रमाणे एकूण ३० हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी १२ ऑगस्ट २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक येथे तक्रार नोंदवली. विभागातर्फे पंच साक्षीदारांच्या उपस्थितीत त्याच दिवशी लाच मागणीची पडताळणी करण्यात आली. यामध्ये, पोलीस हवालदाराने सहा आरोपींना तपासात मदत करण्यासाठी ३० हजार रुपयांची लाच मागितल्याचे आणि लाचेची रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याचे निष्पन्न झाले. ही कारवाई पोलीस निरीक्षक नेहा सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पर्यवेक्षक अधिकारी म्हणून स्वप्नील राजपूत यांनी काम पाहिले. सापळा पथकात पोलीस हवालदार शरद हेंबाडे, नितीन नेचारे, तर गुन्हा दाखल पथकात पोलीस हवालदार विनोद चौधरी व पोलीस शिपाई अनिल गांगोडे यांचा समावेश होता. या कारवाईसाठी नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक प्रदीप मैराळे आणि अपर पोलीस अधीक्षक कविता फळतरे यांचे मार्गदर्शन लाभले.

error: Content is protected !!