दिवाळीनिमित्त इगतपुरीच्या दिव्यांग विद्यार्थ्यांची अनोखी कलाकृती : दिव्यांग विद्यार्थ्यांनी साकारले आकाशकंदील ; पणत्यांना दिली सुबक रंगांची सजावट

इगतपुरीनामा न्यूज – योग्य संधी, प्रोत्साहन आणि मार्गदर्शन मिळाल्यास दिव्यांग मुलेही कोणत्याही क्षेत्रात मागे राहत नाहीत, तर उल्लेखनीय कामगिरी करू शकतात. हाच संदेश इगतपुरी तालुक्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांच्या प्रेरणादायी उपक्रमाने दिला आहे. समावेशित शिक्षणांतर्गत पंचायत समिती इगतपुरीच्या संसाधन कक्षात दिव्यांग विद्यार्थ्यांनी दिवाळीनिमित्त हा प्रेरणादायी उपक्रम राबविला. स्वतःच्या कल्पकतेतून आकर्षक आकाशकंदील तयार करणे आणि मातीच्या पणत्यांना सुबक रंगरंगोटी करून त्यांचे सुंदर सुशोभीकरण करणे या उपक्रमातून या विद्यार्थ्यांनी आपल्या सुप्त कलागुणांचे आणि सर्जनशीलतेचे उत्कृष्ट दर्शन घडवले. इगतपुरीचे गटविकास अधिकारी महेश वळवी, सहाय्यक गटविकास अधिकारी चिमाजी गोडे, गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब मुंडे यांनी या विद्यार्थ्यांच्या कलाकृतींचे आणि उत्साहाचे विशेष कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या रंगीबेरंगी पणत्या मान्यवरांना भेट स्वरूपात दिल्या. 

दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्यातील सर्जनशीलता विकसित व्हावी आणि त्यांचा आत्मविश्वास वाढावा, या उद्देशाने या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. इगतपुरी तालुक्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी पंचायत समिती अंतर्गत संसाधन कक्ष कार्यरत आहे. या कक्षाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अध्ययन, अध्यापनाचे मार्गदर्शन, पालक समुपदेशन, आवश्यक शैक्षणिक साहित्य आणि विविध थेरपी सेवा दिल्या जातात. सध्या दररोज ५ विद्यार्थ्यांच्या नियोजनानुसार एकूण ५५ विद्यार्थी या सेवांचा लाभ घेत असून, त्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर दिला जात आहे. पोषण आहार अधीक्षक सुरेश सोनवणे, शिक्षण विस्ताराधिकारी प्रमोद चिंचोले, किशोर सोनवणे, मंजुषा साळुंखे यावेळी उपस्थित होते. उपक्रमाच्या यशस्वितेसाठी केंद्रस्तरीय विशेष शिक्षक उत्तम आंधळे, स्मिता खोब्रागडे, बाप्पा गतीर, संदीप शिरसाठ, संजय पाटील, निलाक्षी शेलार, मदतनीस सुरेखा जाधव, सविता लाडे यांनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन बाळू गतीर यांनी केले.

error: Content is protected !!