इगतपुरीनामा न्यूज, दि. ९ – धरणाच्या लगत असूनही पिण्याच्या पाण्यासाठी नेहमीच आटापिटा करावा लागत असल्याने एकदाचा पाणीप्रश्न कायमचा सोडवावा ह्या मागणीसाठी आज चार वाजता शेकडो महिला आक्रमक झाल्या आहेत. इगतपुरी तालुक्यातील पिंप्री सदो येथील रुद्रावतार धारण केलेल्या महिलांनी जाणारे येणारे दोन्ही रस्ते बंद करून घोषणाबाजी सुरु केली आहे. गुरुवारी भावली धरण परिसरातील मानवेढे परिसरातील गावांच्या महिलांनी शोले स्टाईल आंदोलन केले होते. आज पिंप्री सदो येथील शेकडो महिला संतप्त झाल्या आहेत. महिला बचत गटाच्या महिलांनी हे आंदोलन सुरु केले असून ह्या महिलांनी प्रशासनाला घाम फोडला आहे. दोन्ही बाजूने वाहने अडकली असल्याने गावात जत्रेचे स्वरूप आल्याचे समजते.
जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजना मंजूर असूनही पाणी नसल्याने महिला तापल्या आहेत. इगतपुरी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वाहिनीमधून गावाला पाणी द्यावे अशी महिलांची प्रमुख मागणी आहे. ह्या गावाजवळ भावली धरण असूनही पाण्याची समस्या महिलांना नेहमीच असते. परिणामी महिलांना अनेक अडचणीला सामोरे जावे लागते. मुख्य पाणीप्रश्नावर प्रशासनाचे अपयश उघडे झाले असून आता आंदोलन करूनच प्रश्न सोडवू असे आंदोलक महिलांनी सांगितले. दरम्यान प्रशासकीय यंत्रणेची चांगलीच धावपळ उडाली असून ह्या आंदोलनाचे लोन इतर गावांत पोहोचेल अशी शक्यता आहे.