इगतपुरीनामा न्यूज, दि. ३०
इगतपुरी तालुक्यातील ग्रामीण भागात वैद्यकीय सोयी सुविधांसह बेटी बचाओ सारख्या जनजागृतीमुळे मुलींचा जन्मदर वाढला आहे. गेल्या ३ वर्षात दरवर्षी लिंग गुणोत्तर प्रमाण वाढल्याचे यश आरोग्य यंत्रणेचे आहे. शासकीय आरोग्य संस्थेत प्रसुती होण्यामुळे नवजात बालक दगावण्याचे प्रमाणही घटले आहे. मात्र तालुक्यातील आदिवासी भागातील गावांपेक्षा महामार्गालगत असणाऱ्या सुशिक्षित गावांत मुलींचा जन्मदर मात्र खालावत आहे. दिवसेंदिवस विकसित होणाऱ्या गावांत कोवळ्या कळ्यांना जन्माआधीच मारले जात असल्याचे स्पष्ट होत आहे. कमी जन्मदर असणाऱ्या गावांत परिणामकारक जनजागृतीची आवश्यकता आहे.
आदिवासी भागापेक्षा शहरीकरण झालेल्या गावांतील सुशिक्षीत कुटुंब मुलींचे गर्भलिंगनिदान करून कायद्याचे उल्लंघन करतात. कोणीही उल्लंघन केल्याचे निदर्शनास आल्यास कठोर कारवाई करण्यात येईल. इगतपुरीचा जन्मदर वाढवण्यासाठी सक्रिय असणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचा आम्हाला अभिमान वाटतो.
- डॉ. एम. बी. देशमुख, तालुका आरोग्य अधिकारी इगतपुरी
जिल्ह्याच्या इतर भागांच्या तुलनेत इगतपुरीत नेहमीच लिंग गुणोत्तराचे प्रमाण चांगले राहिले आहे. ग्रामीण आदिवासी भागातील वैद्यकीय सोयीसुविधा दिवसेंदिवस वाढल्या आहेत. त्यामुळे आता जन्मदराचे प्रमाणही ३ वर्षांपासून वाढले आहे. मुंबई आग्रा महामार्गाच्या लगत असलेल्या काही गावांत मुलींचा जन्मदर दिवसेंदिवस घटत आहे. ह्या गावांपासून नाशिक अगदीच जवळ असल्याने सुशिक्षित म्हणवणारे नागरिक गर्भलिंगनिदान करून मुलींची जन्माला येण्याआधीच हत्या करीत असल्याचा दाट संशय आहे. तालुक्यात शासनमान्य असणारे फक्त ४ सोनोग्राफी सेंटर्स असून नाशिकच्या नोंदणीकृत सोनोग्राफी सेंटर्समध्ये गर्भपात केले जात तर नाही ना असा प्रश्न उपस्थित होत आहे.
शासकीय यंत्रणेने ह्या गावांत मुलीचा जन्मदर वाढविण्यासाठी सक्रीयतेने विविध उपाययोजना वाढवण्याची अपेक्षा आहे. सगळीकडे जनजागृती नेहमीच सुरू असली तरी ह्या गावांत विशेष लक्ष घातल्यास मुलींची संख्या वाढण्यास मदत होईल.
आदिवासी भागातील सर्व गावांत मुलींच्या जन्माचे स्वागत होत आहे तर इतर भागात मुलींच्या गर्भात असतांना हत्या वाढल्याने मुलींचे प्रमाण घटले आहे. इगतपुरी तालुक्याचा मुलींचा जन्मदर २०१९ मध्ये ९२६, २०२० मध्ये ९३६ तर २०२१ मध्ये ९५६ असा विक्रमी नोंदवला गेला. शासकीय आरोग्य संस्था, आरोग्य यंत्रणा, आरोग्य कर्मचारी यांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे मुलींचा जन्मदर वाढतो आहे. ह्या वर्षी कमी जन्मदर असलेल्या भागावर लक्ष केंद्रित करून मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी नियोजन करणार असल्याचे आरोग्य विभागाचे लक्ष्य आहे.
मुलींचा जन्मदर वाढावा ह्यासाठी सर्वसमावेशक सामूहिक प्रबोधनाची गरज आहे. महिलांनीच पुढाकार घेऊन आपल्या कुटुंबियांचे मतपरिवर्तन करावे. कायद्याच्या दहशतीबरोबरच जन्मदाती महिला खंबीर राहिली तर रुत्रीभूृणहत्येचे प्रकार थांबतील.
- माधुरी भदाणे, प्रदेशाध्यक्षा जिजाऊ ब्रिगेड
मुली लक्ष्मीस्वरूप असतात. त्यांना जगात येण्यापूर्वी मारून टाकून अनेकजण महापातक करतात. यामुळे विषमता निर्माण होऊन सामाजिक प्रश्न निर्माण होतात. लोकांनी ह्याकडे गंभीरतेने पाहून स्त्री भ्रूणहत्या थांबवायला हवे.
- मथुरा तानाजी जाधव, घोटी