इगतपुरीनामा न्यूज, दि. २८
घोटी बस स्थानकात थांबलेल्या युवकावर घोटी येथील २ संशयित आरोपी युवकांनी एका व्यक्तिगत कारणातून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी फिर्यादी पिंटू रामा शिंगवा वय ३० रा. राड्याचा पाडा ता. शहापूर जि. ठाणे यांनी घोटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. घोटी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून २ संशयित आरोपी युवकांना अटक केली आहे. श्रावण अमृता आडोळे वय २१ रा. कसारा ता. शहापूर जि. ठाणे असे जखमी साक्षीदाराचे नाव आहे.
घोटी पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, आज दि. २८ ऑक्टोबरला दुपारी फिर्यादी पिंटू रामा शिंगवा, जखमी साक्षीदार श्रावण अमृता आडोळे हे दोघे घोटी येथील बस स्थानकात थांबलेले होते. यावेळी संशयित आरोपी निलेश गणेश भगत वय २१, सागर प्रभाकर आंबेकर वय १९ दोघे रा. इंदिरानगर घोटी ह्यांनी जखमी साक्षीदार श्रावण अमृता आडोळे याला मारहाण व शिवीगाळ केली. संशयित आरोपी निलेश गणेश भगत याने श्रावण आडोळे याला एका व्यक्तिगत कारणावरून तुला सोडणार नाही असे म्हणत धारदार चाकूने वार करून जखमी केले. त्यामुळे श्रावण आडोळे ह्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी फिर्यादी पिंटू रामा शिंगवा वय ३० रा. राड्याचा पाडा ता. शहापूर जि. ठाणे यांनी घोटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी भारतीय दंडविधान संहितेच्या कलम 307, 323, 504, 34 नुसार गुन्हा दाखल करून दोन्ही संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. नाशिक ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली घोटीचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिलीप खेडकर, शीतल गायकवाड आणि पोलीस पथक अधिक तपास करीत आहे.