इगतपुरीनामा न्यूज, दि. १३
वाडीवऱ्हे येथील एका शेतकऱ्याच्या शेतात कामाला असलेल्या शेतमजूरावर दुपारच्या सुमारास दबा धरून बसलेल्या बिबट्याने हल्ला केला. या हल्यात शेतमजूर जखमी झाला असून त्यास उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. वाडीवऱ्हे येथील शेतकरी गणपत दिवटे यांच्या शेतात भात निंदणीचे काम सुरु होते. चार पाच शेतमजूर हे काम करत असतांना सकाळी १० वाजेच्या सुमारास भाताच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक शेतमजूर प्रल्हाद खानजोडे वय २० ह्या कामगारावर हल्ला चढवला. पंजाने त्याच्या पायावर प्रहार केला. अचानक झालेल्या या हल्ल्याने घाबरून जावून त्याने अरडाओरड केली. यावेळी शेजारी काम करणाऱ्या इतर कामगारांनी देखील त्याच्याकडे धाव घेत आरडाओरड केल्याने बिबट्याने तेथून पळ काढला.
दरम्यान कामगाराच्या पायाला जखम झाल्याने त्यास जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. यावेळी शेतकऱ्यांनी पिंजरा लावण्याची मागणी केली आहे. या अगोदर याच मळ्यात बिबट्याने काही कुत्र्यांना भक्ष्य केले आहे. काही जंगली श्वापद सुद्धा या ठिकाणी आहेत. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी घाबरले असून वनविभागाने त्वरित पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी शेतकरी गणपत कोंडाजी दिवटे यांनी केली आहे.