शैलेश पुरोहित, इगतपुरीनामा न्यूज, दि. १०
मुंबई आग्रा महामार्गावरील इगतपुरीच्या बोरटेंभे येथील रेल्वे पुलावर मध्यरात्री २ वाजता ट्रकला अपघात झाला. ह्या अपघातामुळे ट्रकचा काही भाग रेल्वे पुलाला अधांतरी लटकला आहे. यामुळे रेल्वे पुलाच्या संरक्षक भिंतीचा कठडा तुटून रेल्वे ट्रॅकवर पडला असून ट्रकचा एक टायरही निसटून पडला आहे. पुलावरून रेल्वे रुळावर ट्रक पडला असता तर मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती. सुदैवाने ह्या अपघातात जीवितहानी झाली नाही. मात्र रेल्वेची वाहतूक तीन तास विस्कळीत झाली होती.
मुंबई आग्रा महामार्गावर मुंबईच्या दिशेने जाणारा ट्रक क्रमांक MP 09 GH 1658 हा ट्रक मध्यरात्री २ वाजता अपघातग्रस्त झाला. बोरटेंभे पुलावर रस्त्यावरील खड्डे अपघाताला निमंत्रण देत असल्याने ही घटना घडल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. अपघाताची माहिती समजताच रेल्वेचे दुर्घटना राहत दल, आरपीएफ, लोहमार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तीन तासाच्या अथक प्रयत्नांनी ट्रकला बाजूला करण्यात आले. आता मध्य रेल्वेची वाहतूक सुरळीत झाली आहे