सांजेगावचे २ तरुण मुकणे धरणात बुडाल्याची भीती : अंधारामुळे शोधकार्य थांबवले, उद्या सकाळी पुन्हा शोध मोहीम

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील मुकणे धरण परिसरात एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. सांजेगाव येथील दोन तरुण मुकणे धरणाच्या पाण्यात बुडाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. आज गुरुवारी दुपारी हे दोन्ही तरुण धरणावर पोहण्यासाठी गेले असल्याचे स्थानिक नागरिकांनी पाहिले होते. मात्र, रात्र झाली तरी ते घरी न परतल्याने या घटनेला उजाळा मिळाला. मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही तरुण दुपारी धरणावर गेले होते. सायंकाळ झाली तरी दोघेही घरी न पोहोचल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी चिंताक्रांत होऊन शोध सुरू केला. शोध घेताना मुकणे धरणाच्या किनाऱ्यावर या तरुणांचे कपडे आणि वस्तू आढळून आल्या. त्यामुळे तरुण पाण्यात बुडाल्याची शंका बळावली असून, कुटुंबीयांनी तातडीने वाडीवऱ्हे पोलीस ठाण्याला याची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच वाडीवऱ्हे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिक आणि अनुभवी पाणबुड्यांच्या मदतीने धरणाच्या पाण्यात तातडीने शोधमोहीम हाती घेण्यात आली. सलग काही तास शोध घेऊनही तरुणांचा काहीही पत्ता लागू शकला नाही. दरम्यान, रात्र झाल्याने आणि अंधार पसरल्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव गुरुवारी रात्रीचे शोधकार्य थांबवण्यात आले आहे. उद्या शुक्रवारी सकाळी उजाडताच पोलीस, स्थानिक बचाव पथक आणि पाणबुड्यांच्या साहाय्याने धरणात पुन्हा एकदा शोधमोहीम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेमुळे सांजेगाव व परिसर ऐन दिवाळीमध्ये स्तब्ध झाला असून कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.

error: Content is protected !!