संजीवनी शेतकरी गटाची यांत्रिकीकरणाकडे यशस्वी वाटचाल : शेतकऱ्यांच्या अडचणीवर कृषी अधिकाऱ्यांची तत्परता

इगतपुरीनामा न्यूज – ‘सत्यमेव जयते फार्मर कप २०२६’ मध्ये सहभागी झालेल्या इगतपुरी तालुक्यातील शेनवड बुद्रुक येथील ‘संजीवनी शेतकरी गटाने’ कृषी क्षेत्रात आधुनिकतेची कास धरत यांत्रिकीकरणाकडे यशस्वी वाटचाल सुरू केली आहे. यंदाच्या खरीप हंगामात ‘डी.एस.आर.’ तंत्रज्ञानाचा अवलंब करून भात पिकाचे भरघोस उत्पन्न घेतल्यानंतर, आता रब्बी हंगामात त्याच भाताच्या बेडवर गहू आणि हरभरा पिकाची टोकण पद्धतीने लागवड करण्याचे नियोजन गटाने केले आहे. टोकण पद्धतीने रब्बी पिकांची लागवड करताना लागणारा वेळ आणि मनुष्यबळ कमी कसे करता येईल, अशी विचारणा संजीवनी शेतकरी गटाने इगतपुरीचे तालुका कृषी अधिकारी रामदास मडके यांच्याकडे केली होती. शेतकऱ्यांच्या या समस्येचे निरसन करण्यासाठी तालुका कृषी अधिकारी रामदास मडके, मार्गदर्शक तथा मेंटार शिवचरण कोकाटे, फाउंडेशनचे उपविभागीय समन्वयक अजिंक्य गुरव, कल्याणी माळी यांनी तत्परतेने विशेष नियोजन केले. या नियोजनानुसार ‘हरिहर ॲग्रो रिसर्च इंडिया प्रायव्हेट लिमिटेड’चे ओमराजे निंबाळकर यांना शेतकऱ्यांना मार्गदर्शन व प्रशिक्षणासाठी आमंत्रित करण्यात आले होते. याप्रसंगी रणजित निंबाळकर यांनी प्रत्यक्ष शेतावर भेट दिली. गटातील शेतकरी भरत कडू यांच्या शेतावर टोकण यंत्राद्वारे गव्हाच्या टोकण पद्धतीचे प्रात्यक्षिक उपस्थितांना करून दाखवण्यात आले. यावेळी रणजित निंबाळकर यांनी ‘डी.एस.आर.’ लागवड पद्धतीविषयी उपस्थित शेतकऱ्यांशी सविस्तर चर्चा केली. भात लागवडीमध्ये वेळेची बचत व्हावी आणि मजुरीचा खर्च आणखी कमी व्हावा, या दृष्टीने पुढील वर्षाच्या खरीप हंगामापूर्वी योग्य अंतरावर भात लागवड करता येईल अशा तांत्रिक सुधारणा करून सुधारित टोकण यंत्र पुरवण्याचे आश्वासन त्यांनी शेतकऱ्यांना दिले.

या प्रशिक्षण व प्रात्यक्षिकाच्या यशस्वी आयोजनाबद्दल कार्यक्रमाचे निमंत्रक कोंडाजी गिळंदे व संजीवनी शेतकरी गटातील सर्व सदस्यांनी तालुका कृषी विभाग आणि हरिहर ॲग्रोच्या प्रतिनिधींचे आभार मानले. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे शेनवड बुद्रुक परिसरातील इतर शेतकऱ्यांसाठी संजीवनी शेतकरी गट मार्गदर्शक ठरत आहे.

error: Content is protected !!